शहर पोलिसांनी लवकरात लवकर गंठण चोरट्यांचा बंदोबस्त करावा – महिलांची मागणी
युवावार्ता (प्रतिनिधी) –
संगमनेर – शहर पोलीसांचा गंठण चोरांवर वचक, राहिला नसल्याने गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरातील विविध भागांत गंठण चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असल्याचे दिसत आहे. गुरुवारी पुन्हा दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन महिलेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठण चोरून पोबारा केला आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून
मिळालेली माहिती अशी, की अंजना बाबासाहेब वर्षे (वय 53, रा. संगमनेर कॉलेज समोर, बेकरीच्या पाठीमागे) या गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पायी घरी जात असताना अंधाराचा फायदा घेऊन समोरून दुचाकीवरून दोघे अज्ञात चोरटे आले आणि पाठीमागे बसलेल्या चोरट्याने अंजना वर्षे यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढून पोबारा केला. यावेळी वर्षे या घाबरून गेल्या होत्या. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्या चोरट्यांनी चांगलाच् उच्छाद मांडला असल्याचे अधोरेखीत होत आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी लवकरात लवकर गंठण चोरणार्या ’चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिलांमधून होत आहे.