इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonweath Games 2022 ) स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे सांगलीच्या मराठमोळ्या संकेत महादेव सरगरने (Sanket Sargar) भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे. ५५ किलो वजनी गटात संकेतने रौप्य पदक जिंकले. संकेत सरगरने दोन फेऱ्यांमध्ये 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. त्याला सुवर्णपदकाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिली. वेटलिफ्टर संकेत सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात देशासाठी रौप्य पदक जिंकले. मलेशियाच्या मोहम्मद अनिदने सुवर्णपदक पटकावले.
संकेतने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात 107 किलो वजन उचलले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 111 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 113 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात संकेतने १३५ किलो वजन उचलले. पण, त्याचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न फसला. त्याने 248 किलो वजनासह दुसरे स्थान पटकावले. मलेशियाच्या वेटलिफ्टरने एकूण 249 किलो वजन उचलले आणि संकेतला फक्त 1 किलोच्या फरकाने मागे टाकले.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संकेतच्या रुपाने भारताला पहिलं पदक मिळालं. मूळचा सांगलीचा असलेल्या संकेतने यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलीच, पण चमकदार कामगिरी करून लोकांची त्याने मनंही जिंकली. त्याने पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 वजन उचलले. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये १३५ वजन उचलून पदक जिंकले. गेल्या वर्षी चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
संकेतचं मूळ गाव सांगली आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान पटकावलेला संकेत महादेव सरगर हा भारताचा स्टार वेटलिफ्टर आहे. तो ५५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या वर्षी ताश्कंद येथे झालेल्या चॅम्पियनशिप 55 किलो स्नॅच स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
संकेतच्या रौप्यपदकाची कमाईची बातमी येताच सांगलीत जल्लोषाला सुरुवात झाली आहे. संकेतच्या मूळ गावी लोकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून संकेतच्या यशाचा आनंद साजरा केला आहे. संकेतचं यश म्हणजे आम्ही आमचं यश समजतो. त्यांच्या प्रयत्नांना आज फळ मिळालं. तो खूप मेहनती आहे. भारताला कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत त्याच्या रुपात पहिलं पदक मिळालं आहे.