योजनांसाठीचे पैसे जनतेचे आहे, महायुतीचे नाही – सौ. तांबे
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महाराष्ट्राला संत व समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान केला जातो. मात्र महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे. महायुतीचा नाही. आ. रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी अशी मागणी सौ. दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.
संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला .यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, सुरेश थोरात, निखिल पापडेजा, अर्चनाताई बालोडे, पद्माताई थोरात, मीनाक्षीताई थोरात, प्रमिला अभंग, दिपाली वर्पे, मीना थेटे, प्राजक्ता घुले, शितल उगलमुगले, ओमकार बिडवे, शुभम घुले, गौरव डोंगरे, जावेद शेख, तानाजी शिरतार, आनंद वर्पे, मीराताई शेटे, बेबीताई थोरात, निर्मलाताई राऊत, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, एकनाथ श्रीपाद, अलोक बर्डे, अमित गुंजाळ आदींसह युवा काँग्रेस व महिला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, महाराष्ट्राला थोर समाज सुधारक आणि संतांची परंपरा आहे महिलांचा सन्मान होणार्या या महाराष्ट्रात महायुतीने महिलांचा अपमान केला आहे. पंधराशे रुपये महिला भगिनींसाठी देतात हे पैसे महायुतीची नसून जनतेच्या कष्टाचे आहेत.
निवडणुका जवळ आल्याने अनेक फसव्या घोषणा केल्या जात आहेत. पैसे परत करण्याची बेताल वक्तव्य सत्ताधारी आमदार करत आहेत आणि यावेळी व्यासपीठावर सर्व मंत्री उपस्थित आहेत या अत्यंत दुर्दैवी आहे .यांच्या मनातील आता ओठावर येऊ लागले आहे. राणा दांपत्य हे प्रसिद्धीसाठी नेहमी अशी बेताल वक्तव्य करत असतात.
राज्यात प्रचंड महागाई वाढली आहे. भाजीपाला महाग झाला आहे .बेरोजगारी वाढली आहे. या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष वळवण्यासाठी अमिष दाखवली जात आहे. हे गलिच्छ राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे.