संगमनेर- अकोले तालुक्यातही भक्त आणि बिल्डरांना लावला चुना ?

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भोंदू खरात प्रकरणाचे धक्कादायक पैलू उघडकीस येत असून त्याच्या आर्थिक व्यवहारांचे जाळे राज्यभर पसरल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
नाशिक येथील अशोक खरात उर्फ भोंदू खरात याच्या कथित अश्लील कृत्यांमागे मोठ्या आर्थिक व्यवहारांचे जाळे दडले असल्याचे संकेत मिळू लागले असून, या प्रकरणाला आता गंभीर आर्थिक व संघटित गुन्हेगारीचे स्वरूप येत आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचे व जमिनींच्या खरेदी-विक्रीचे संपूर्ण नियोजन पुण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंटमार्फत होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सीए गेल्या पाच वर्षांपासून खरातसोबत अत्यंत जवळून काम करत होता. ‘ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’वरही त्याने विश्वस्त म्हणून काम पाहिले असून, खरातच्या व्यवहारांतील प्रत्येक पैशाचा हिशोब याच माध्यमातून पूर्ण होत असल्याचे सांगितले जाते. सध्या तो ट्रस्टवर नसला तरी आर्थिक व्यवहारांशी त्याचा संबंध असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे आता संगमनेर आणि अकोले तालुक्यांपर्यंत पोहोचले असून, काही स्थानिक व्यक्ती व व्यावसायिक या जाळ्यात अडकल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे संगमनेरमधील दोन मोठ्या कंत्राटदारांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समजते. बदनामीच्या भीतीने संबंधितांनी मौन बाळगले आहे. तसेच एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही नागरिकांना खरातपर्यंत पोहोचवून आर्थिक फसवणूक केल्याचेही बोलले जात आहे. ग्रामीण भागातील काही सामान्य नागरिकही खरातच्या जाळ्यात अडकल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संगमनेर-अकोले येथील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. अशोक खरातने आध्यात्मिक क्षेत्रासोबतच रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे उघड होत आहे. संगमनेर शहरालगत त्याची मालमत्ता आढळून आली असून ती त्याच्या मुलीच्या नावावर असल्याची माहिती पुढे आली आहे. विविध ठिकाणी जमिनींचे व्यवहार करून मोठी मालमत्ता उभी केली आहे. दरम्यान, अश्लील व्हिडिओंच्या आधारे आर्थिक ब्लॅकमेलिंग केल्याचे आरोप होत असून त्या माध्यमातून मिळालेल्या पैशांचा वापर नेमका कसा झाला याचा शोध सध्या विशेष तपास पथक करत आहे. या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राथमिक चौकशीतून हे प्रकरण केवळ एका भोंदू बाबाच्या कृत्यांपुरते मर्यादित नसून, त्यामागे बिल्डर, एजंट, काही राजकीय व प्रशासकीय घटकांचा सहभाग असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे.

प्रकरण उघडकीस येत असतानाही संबंधितांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक जण पुढे येण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र आगामी काळात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे संगमनेर, अकोलेसह राज्यभरात खळबळ उडाली असून, तथाकथित आध्यात्मिकतेच्या आडून चालणार्या गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डिजिटल माध्यमांमुळे अशा प्रकरणांचा पर्दाफाश होत असल्याने समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित होत आहे.





















