बाळासाहेब थोरातांकडून महाराजांच्या किर्तनाची चिरफाड

0
2010

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -हिंदु धर्म आणि कीर्तनाच्या आडून कुणाची तरी सुपारी घेऊन समाजात द्वेष, मत्सर निर्माण केला जात आहे. एक मोठे षड्यंत्र रचून संगमनेरातील शांतता, सुबत्ता, सहकार मोडीत काढण्याचा डाव रचला जात आहे. सत्ता बदल करून यांनी संगमनेरचे वाटोळे करण्याचा विडा उचलला आहे. नारदाच्या गादीवरून देशाचे संविधानाविरूद्ध वक्तव्य करून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला गेला. धक्काबुक्की आणि गाडी फोडल्याचा बनाव रचून 11 तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासर्व षड्यंत्राचा संगमनेरकर एकजुटीने विरोध करत असून यापुढे अशा ढोंगी महाराजांना आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या सत्तेला जनतेने धडा शिकवावा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. त्याचबरोबर या किर्तनात महाराजांनी रचलेला बनाव व द्वेषरूपी कीर्तनाचा जाहीर भांडाफोड नागरीकांच्या समोर केला आहे.

अनेक वर्षांनी संगमनेरमध्ये अभूतपूर्व मोर्चा
संगमनेर शहर व तालुक्यात घडणार्‍या घटनांचे पडसाद संगमनेर स्टॅण्डवर विविध आंदोलनांच्या निमित्ताने उमटत असताता. बाळासाहेब थोरातांवर झालेल्या टिकेविरूद्ध आयोजीत केलेल्या शांती मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी होेते. प्रांत कार्यालयापासून एसटी स्टॅण्डचा परीसर नागरीकांनी भरून गेला होता. संगमनेर शहरातील नागरीकांबरोबरच ग्रामीण भागातील नागरीकांची संख्याही मोठी होती. सभेच्या ठिकाणी ध्वनी व दृष्य व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकराची अनूचीत घटना न घडता शांती मोर्चा शांततेने पार पडला.

तालुक्यातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचे किर्तन काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद पाडले. तसेच महाराजांना धक्काबुक्की करून त्यांची गाडी फोडण्यात आली असा मोठा आरोप करुन 11 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सदर महाराजांनी बाळासाहेब थोरात यांना थेट नथुराम गोडसे होऊन मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संगमनेरसह संपूर्ण राज्यात संतापची लाट उसळली होती. महाराजांच्या या धमकी विरोधात बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ आज गुरूवारी संगमनेरात यशोधन कार्यालय ते बसस्थानकापर्यंत भव्य शांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. मोर्चानंतर नविन नगर रोड येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेत बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या स्क्रिनवर विविध फुटेज दाखवून जाहीर पुराव्यानिशी महाराजांनी केलेल्या कीर्तनातील द्वेषपुर्ण भाषण, धक्काबुक्की व गाडी फोडण्याचा केलेला बनाव उघड केला. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संग्राम भंडारे यांच्या कीर्तनाची व त्यांच्या चलाखीची चिरफाड केली. यावेळी व्यासपीठावर आ. सत्यजीत तांबे, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, अजय फटांगरे, हिरालाल पगडाल, सोमेश्वर दिवटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तन सोहळ्यात संग्राम भंडारे यांनी केलेल्या वादग्रस्त कीर्तनाचे विविध फुटेज दाखवून काँग्रेसला व आपल्याला कसे बदनाम करण्यात आले, कसा खोटा बनाव रचला याचे पुरावे देत प्रचंड अक्रमकपणे विरोधकांवर हल्ला केला. संगमनेर विकासात अग्रेसर आहे. शांतता आणि समृद्धी येथील श्वास आहे. मात्र हे काहींना देखवत नसल्याने दोन समाजामध्ये सातत्याने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भंडारे यांच्यासारख्या महाराजांचा वापर केला जात आहे. स्वत:चीच माणसे कीर्तनात पेरून, स्वत:च गाडी फोडून तरूणांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पोलीस देखील राजकीय दबावाला बळी पडून विरोधकांना अन्यायकारक वागणूक देत आहे. परंतू आता संगमनेर तालुका हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही देखील वारकरी पंथातील आहोत. सर्वांना सोबत घेऊन जाणारा संत ज्ञानोबा, तुकोबांचा वारसा जपत आहोत. राज्य घटनेला प्रमाण मानत आहोत. मात्र या दुष्ट शक्तीविरोधात यापुढे आपल्याला देखील अक्रमक व्हावे लागेल. त्यासाठी संपूर्ण तालुक्यातील जनतेने पुढे यावे. कुणावरही अन्याय झाल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही याप्रसंगी थोरात यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here