नियुक्ती जुन्नरमध्ये, उपोषण संगमनेरमध्ये
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यात सुरेश कांतिलाल घोलप हे कृषि पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. सदर कालावधीत संबंधिताने कार्यालयीन व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अश्लिल फोटो शेअर केले होते. त्यामुळे त्याला समज देऊन देखील सन 2022-23 मध्ये कार्यालयाचे अधिकृत कार्यालयीन ईमलवर व व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये पुनश्च अश्लिल फोटो शेअर केले. तसेच त्याचे कौंटुबिक कलह प्रकरण देखील संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्याच्याकडून अश्लिल फोटो वारंवार सार्वजनिक केल्यामुळे कार्यालयीन कर्मचार्यांमध्ये तीव्र असंतोष व महिला कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने त्याची विशाखा समितीमार्फत चौकशी होऊन त्याच्यावर निलंबन व त्यानंतर बदलीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे दुखावल्याने त्याने तालुक्यातील विविध कृषि विषयक कामकाज करताना नकळत राहिलेल्या त्रुटी व कामकाजातील अनियमितता यांचे भांडवल करुन तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असून अधिकार्यांच्या चौकशीची मागणी करून त्रास देण्याच्या उद्देशाने उपविभागीय कृषी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. परंतु हे उपोषण चुकीचे व जाणीवपूर्वक करण्यात येत असून सुरेश घोलप याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्व कृषी कार्यालयातील कर्मचार्यांनी विभागीय कृषी सहसंचालक पुणे यांना निवेदन दिले आहे.
सातत्याने गैरवर्तन व कर्मचार्यांना त्रास देणे अश्लील वर्तन करून उलट विनाकारण माहिती अधिकार कायदयाचा गैरवापर करणे, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, वरिष्ठ कार्यालयात उपोषणास बसणे आदी प्रकार करुन सुरेश घोलप हा जाणीवपूर्वक त्रास देत आहे.
श्री. घोलप, कृषि पर्यवेक्षक, ओतूर, ता. जुन्नर, जि.पुणे येथे बदलीवर कार्यरत असतानाही वारंवार तो तालुका कृषि अधिकारी, संगमनेर यांचे कार्यालयामध्ये येऊन विनाकारण माहिती अधिकार अर्ज, तक्रारी दाखल करीत आहे. त्याचे कार्यक्षेत्रातील कामकाजाकडे लक्ष न देता तो नेहमीच संगमनेर येथे असतो व स्वग्राममध्येच राहत आहे.
श्री. घोलप, कृषि पर्यवेक्षक यांच्या प्रवृत्तीमुळे संगमनेर तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी हे प्रचंड मानसिक तणावात असून त्याचा कामकाजावर विपरित परिणाम होत आहे, तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी कार्यरत असून क्षेत्रिय स्तरावर कामकाज करताना त्यांची कुचंबना होत आहे. संगमनेर तालुक्यात कृषि विभागामार्फत तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवाना विविध योजनांचा लाभ मिळत असून शेतकरी बांधवांच्या कोणत्याही कामकाज विषयक तक्रारी नाही. असे येथील अधिकार्यांचे म्हणने आहे. मात्र श्री. घोलप, कृषि पर्यवेक्षक याने जिल्हास्तरावर देखील माहिती अधिकार अर्ज, तक्रारी दाखल केलेल्या असून त्याचा जिल्हा स्तरावरील कामकाजावर परिणाम होण्याची भिती आहे, त्यामुळे कृषि विभागाच्या पुणे विभागात संगमनेर तालुक्याचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे या कर्मचार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वतः कृषी कर्मचार्यांनी केली आहे.