मत पेटीत भवितव्य बंद- उमेदवारांना निकालाचा घोर
संगमनेर मध्ये विक्रमी 74% मतदान
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी निकराची, तितकीच अटीतटीची राजकीय लढाई महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान पार पडले. देशातील आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षासाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवयाची याचा फैसला राज्यातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक मतदारांनी घेतला आहे. हा फैसला आता मतपेटीत बंद झाला असून 23 तारखेला त्याचा निकाल होणार आहे.
महायुती व महाविकास आघाडी आणि छोट्यामोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणार्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची, याशिवाय त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरात एकाचवेळी मतदानाला सुरुवात झाली. संगमनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात नवव्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच महायुतीकडून अमोल खताळ यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरून विखे यांच्या साथीने बाळासाहेब थोरात यांना शह दिला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील 152 ठिकाणी 288 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान सकाळी पहिल्या एक तासात तालुक्यात 6.94 टक्के मतदान झाले होते तर 6 वाजेपर्यंत संगमनेर मध्ये विक्रमी 74% मतदान झाले.
या निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदार संघात थोरात -खताळ अशी लढत होती. परंतु विखे परिवाराने खताळ यांच्या पाठीशी संपूर्ण शक्ती पणाला लावली. थोरात यांच्या विरोधातील नाराजी, हिंदुत्ववादी विचार आणि विखे यांची यंत्रणा यामुळे पहिल्यांदाच येथील निवडणुक चांगलीच चुरशीची होताना पहायला मिळाली. आ. थोरात समर्थकांकडून विजयाचा दावा करण्यासह लाखाचे मताधिक्य घेणार असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे तर महायुतीकडून यावेळी जादू होणार, परिवर्तन होणार असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अकोले तालुक्यात तिरंगी लढत झाली असून विद्यमान आमदार लहामटे यांच्यावर मतदार पुन्हा विश्वास दाखवताता की, नविन नेतृत्व अमित भांगरे यांना साथ देतात, वैभव पिचड यांना सहानुभूती मिळणार का? याचा देखील निर्णय मतपेटीत बंद झाला आहे. संगमनेर बरोबरच शिर्डी मतदार संघातील निवडणूक जोरदार गाजली. विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीने प्रभावती घोगरे यांना मोठे बळ दिले. तर भाजपचेच राजेंद्र पिपडा यांनी बंडखोरी करून विखे यांना आव्हान दिले. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे येत्या शनिवारी पहायला मिळणार आहे.
राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लोकसभेनंतर विधानसभेला जोरदार लढाई झाली. आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, हाणामार्या, व्यक्तीगत बदनामी, गोळीबार, पैशांची देवाण-घेवाण यासह रडण्याच्या व सहानुभूतीच्या अनेक विचित्र घटना समोर आल्या. खोके, गद्दार, निष्ठावान, देशद्रोही, देशभक्त, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे अनेक नारे मतासाठी दोन्ही बाजूंनी करण्यात आले.
यासर्व गदारोळाला पाहून सुज्ञ मतदारांनी आपला निर्णय घेतला असून 23 तारखेला कुणाला सत्तेवर बसवून दिवाळीचा आनंद द्यायचा आणि कुणाला बाहेर काढून दिवाळे काढायचे याचा योग्य निर्णय मतदारांनी घेतला असून या निर्णयाकडे महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.