अनोखा फंडा आणि हजारोंना घालतात गंडा
युवावार्ता (ललित ओझा)
संगमनेर- सध्या शहरात परगावातून व परराज्यातून काही महिला व युवतीची टोळी दाखल झाली आहे. या टोळीककडे अनेक लहान मुले आहेत. कधी या मुलांच्या आजारपणाचे, कधी उपाशी असल्याचे तर कधी आम्हाला गावी जायचे आहे असे अनेक बहाणे करून शहरात प्रवाशी वर्ग, दुकानदार, व्यापारी यांच्याकडून पैसे उकळले जात आहे. मात्र त्यांच्याकडे असणारे मुले त्यांचेच आहेत का?, महिला मोठ्या प्रमाणावर असताना व सोबत मुले असताना त्यांचा नवरा, किंवा या मुलांचा पालक नेमका कोण याची कुठल्याही प्रकारची माहिती कुणाकडे नाही किंवा तशी व्यवस्था आपल्याकडे नसल्याने या महिला रात्रंदिवस अनेक फंडे वापरत नागरीकांना गंडा घालत आहेत.
शहरातील विविध मंदिरे, बसस्थानक, बाजारपेठ परिसरात या महिला मुले, नवरा आजारी आहे किंवा आमच्याकडं गावी जायला पैसे नाहीत, असे आगळी वेगळी कारणे देऊन या महिला अनेक वेळा पैशांसाठी हट्ट धरतात. अनेक वेळा या संघटीत महिला अनेकांना गंडा देखील घालतात. रात्रीच्या वेळेस देखील बसस्थानक, दिल्ली नाका, मेनरोड, बाजारपेठ, नविन नगर रोड या परिसरात फिरुन लोकांना काही तरी या खोटं नाट कारण सांगून पैसे मागत राहतात. हातात पुरेसे पैसे, अन्न असताना देखील ते पैसे मागत असल्याने अनेक वेळा त्यांच्यावर शंका येते. परंतु नाहक झंझट नको म्हणून कुणी फारसी विचारपूस करत नाही. तसेच कोणतेही प्रशासन त्यांच्याकडे विचारपूस किंवा चौकशी किंवा त्यांची काळजी घेत नाही. त्यामुळे नागरीकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.