एलआयसी विकास अधिकार्‍यांचे नेतृत्व करणार्‍या राजेंद्र लगे यांचे निधन

0
1049

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर येथील निवृत्त ङखउ विकास अधिकारी राजेंद्र लगे यांचे गुरूवार दि. 6 जून रोजी प्रदीर्घ आजाराने नाशिक येथे दु:खद निधन झाले. वाचनाची आवड असणारे आणि अत्यंत हसतमुख राजेंद्र लगे हे संगमनेर साहित्य परिषदेचे सदस्य होते. 1986 साली एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून संगमनेर येथे त्यांनी आपल्या नोकरीची सुरूवात केली. आपल्या अनुभवाच्या आधारे नगर जिल्ह्यातील एलआयसी विकास अधिकार्‍यांच्या संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते 2022 साली एलआयसीमधून निवृत्त झाले.


2022 मध्ये अगदी थाटात त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ करण्यात आला. संगमनेर-अकोले मधील शेकडो विमा प्रतिनिधींना उत्त्पन्नाचे साधन त्यांनी निर्माण केले. हजारो विमाधारकांना त्यांना विमारूपी संरक्षण दिले. अनेक विकास अधिकार्‍यांना त्यांनी मार्गदर्शन केले. विमा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विमा प्रतिनिधींना त्यांनी मानाचा आंतरराष्ट्रीय एमडीआरटी हा सन्मान मिळवून दिला. राजेंद्र लगे यांच्याकडे संघटन कौशल्य होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक माणसे जोडली. अनेक पारिवारीक जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. पत्नी मिनाक्षी यांच्या साथीने आपली मुले अमृता आणि शुभम यांना सिव्हील इंजिनिअर करून त्यांनी उच्चशिक्षीत केले. अत्यंत मृदू आणि मनमिळावू स्वभावाच्या राजेंद्र लगे यांच्या निधनाने संगमनेर आणि एलआयसी क्षेत्रातील मित्र परिवाराला धक्का बसला आहे. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने राजेंद्र लगे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here