सुगावमध्ये ढिसाळ यंत्रणेमुळे तर संगमनेरात दोघांचे बुडून बळी

0
1406

जबाबदार प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये ?

संगमनेरात वाळू उपसा हा सतत वादाचा विषय राहिला आहे. सरकार कुणाचेही असो हा प्रश्न कुणालाही सोडविता आलेला नाही. कारण या गोरख धंद्यात राजकीय कार्यकर्ते आणि प्रशासनाची मिलीभगत असल्याने सतत विरोध करुनही ट्रॅक्टर, जीप, रिक्षा, बैलगाडी गाढवांद्वारे वाळूचोरी करणार्‍यांनी शहरातील गंगामाई घाट, हनुमान टेकडी, केशवतीर्थ, महादेव मंदिराचा परिसर, म्हाळूंगी परिसर पोखरून काढला आहे. या प्रचंड वाळू उपश्यामुळे नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे आणि कपारी निर्माण झाल्याने पोहणार्‍यांसाठी प्रवरा नदीपात्र अत्यंत धोकादायक ठरले आहे. या अवैध वाळू उपश्याला नागरीकांचा असलेला विरोध झुगारून प्रशासनाच्या मदतीने या वाळू तस्करांनी केलेल्या खड्ड्यांनी आत्तापर्यंत अनेक बळी घेतले आहे. तरीही महसूल, पोलीस प्रशासनाला कसलेही सोयरसुतक नाही. ज्या वाळूतून अमाप पैसा जमवला जातो त्यातून किंवा प्रसंगी शासनाला आणखी खड्ड्यात घालून आवर्तन सुटण्यापुर्वी जेसीबीने नदीपात्रातील धोकादायक खड्डे बुजविल्यास अनेकांचे प्राण वाचू शकेल. परंतु एवढी सुबुद्धी प्रशासनाला नसल्याने आपण आजपर्यंत फक्त बळी मोजत आहोत.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – बुधवारी अकोले तालुक्यातील सुगांव बुद्रुकमध्ये दोघे प्रवरा पात्रात बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह शोधताना गुरुवारी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तिघां जवानांसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत असतानाच संगमनेरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गंगामाई परिसरातील प्रवरानदी पात्रात पोहत असताना दोघा सतरा वर्षीय मुलांचा वाळू तस्करांनी पोखरलेल्या मोठ्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसात आठ मृत्यू प्रवरा नदीत झाले. वरकरणी हे मृत्यू जरी मयत मुलांच्या चुकीमुळे झाले आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात सुगांव बचाव पथकाची दुर्घटना हे प्रशासनाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे तर संगमनेरच्या दुर्घटनेला वाळू तस्कर व त्यांना साथ देणार्‍या महसूल, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेचे बळी ठरले आहे. त्यामुळे अशा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये अशी संतप्त प्रतिक्रिया जणमाणसातून उमटत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे, त्यातच मुलांना शालेय सुट्ट्या आहेत. गेल्या 20 दिवसांपासून प्रवरामाई वाहती आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी अनेक नागरीक आपल्या मुलांसह नदीकाठी फिरण्यासाठी, आंघोळीसाठी तर काही पोहणारे पोहण्यासाठी गर्दी करतात. नेहमीप्रमाणे अनेक जण नदीपात्रात आंघोळीचा व पोहण्याचा आनंद घेत असताना गंगामाई परिसरात घाटालगत असणार्‍या एका विहिरीजवळ आदित्य रामनाथ मोरे (वय 17, रा.घुलेवाडी) व श्रीपाद सुरेश काळे (वय 17, रा.कोळवाडे) हे दोघे तरुण पोहोत असताना अचानक एका मोठ्या खड्ड्यात एकापाठोपाठ दोघेही बुडाले. एकमेकांना वाचवण्यासाठी ते प्रयत्न होते तर यावेळी नदीपात्रात असलेल्या काहींनी त्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला तसेच त्यावेळी त्यांच्या मदतीला गेलेला एक जण देखील या संकटात सापडला होता. परंतु सुदैवाने त्याने तो खड्डा पार केला. या घटनेनंतर अर्धातासाने बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर अन्य लोकांनी ते बाहेर काढले. पुढे पोलीस प्रशासनाने ठरल्याप्रमाणे शासकीय प्रक्रिया पार पाडली. एका धक्क्यातून सावरत असतानाच दुसर्‍या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान सुगांवमध्ये एका तरूणाचा मृतदेह शोधताना चार जणांचा बळी जाणे हे खुपच धक्कादायक आहे. मात्र हे बळी टाळण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दक्षता घेतलेली दिसत नाही. कारण बुधवारी दुर्घटना घडली त्यानंतर पाण्याचा प्रवाह बंद किंवा कमी करणे गरजेचे होते, घटनास्थळी मदतीला आलेल्या पथकाला घटनास्थळाची पुरेशी माहिती नव्हती, त्यांना माहितगार उपलब्ध करून देणे प्रशासनाचे काम होते, सोबतच बचाव पथकाला पुरेसे संसाधन देणे, एकापेक्षा अधिक रुग्णवाहिका सोबत डॉक्टर असणे गरजेचे होते परंतु या ठिकाणी तसे काही केल्याचे दिसत नाही. तसेच एक मृतदेह शोधण्यासाठी थेट धुळे येथून आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण करणे हा निर्णय सुध्दा चुकल्याचे दिसत आहे. या परिसरात अनेक केटीवेअर असून या केटीवेअरने अनेक बळी घेतलेले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here