17 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण ओढून (चेन स्नॅचिंग) चोरून नेण्याच्या घटना संपूर्ण नगर जिल्ह्यात सातत्याने घडत होत्या. संगमनेरमध्ये देखील या घटना घडण्याचे प्रमाण मोठे होते. मोटार सायकल वरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडले जात होते. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते. स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पाठलाग करीत सोनसाखळी चोरी करणार्या चोरांची टोळी पकडली आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून 15 लाख 5 हजार रुपये किमतीचे 215 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1 लाख रुपये किमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल तसेच 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण 17 लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ शैल्या चव्हाण, सुनील शामिल पिंपळे, विशाल सुनील पिंपळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ शैल्या चव्हाण (वय 26, राहणार मोहटा देवी मंदिर मागे, अशोक नगर, तालुका श्रीरामपूर), सुनील पिंपळे (वय 37, राहणार वसु सायगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर), विशाल सुनील पिंपळे (वय 22 , राहणार वसू सायगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) राजेश राजू सोलंकी (राहणार सुहागपुर, जिल्हा होशींगबाद, मध्य प्रदेश – फरार) ऋषिकेश कैलास जाधव (राहणार श्रीरामपूर-फरार) रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे (राहणार श्रीरामपूर-फरार) अशी सर्व आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना खबर मिळाली की, यातील शैल्या चव्हाण हा आरोपी चोरी केलेले सोने विक्रीसाठी साथीदारासह श्रीरामपूर ते नेवासा जाणार्या रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने अशोकनगर फाटा, श्रीरामपूर या ठिकाणी सापळा रचून आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. या गुन्हेगारांनी संगमनेरमध्ये दहा, कोपरगावमध्ये पाच, तोफखाना नगर पोलीस ठाण्यात तीन, राहुरी पोलीस ठाण्यात तीन, शिर्डी पोलीस ठाण्यात सहा ठिकाणी गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे.