एसडीआरएफच्या तीन जवानांसह तिघांचा मृत्यू, दोघे बचावले
अकोले/ संगमनेर
बुधवारी उजनी धरणात बोट उलटून सहाजण बुडाले होते. त्यातील बेपत्तांचा शोध सुरू असतानाच आता अकोले तालुक्यात अतिशय धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सुगांव बुद्रुंक शिवारातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांमधील एकाचा शोध घेण्यासाठी धुळे येथून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) बोट उलटून त्यातील चौघा जवांनासह एक स्थानिक असे सहाजण पाण्यात पडले. पाण्याच्या दाबाचा व खोलीचा अंदाज न आल्याने व भोवर्यात अडकल्याने यातील तिघांचा मृत्यू झाला. तर दोघांना वाचविण्यात दुसर्या पथकाला यश आले. मात्र एक जण अद्यापही बेपत्ता आहे. बुधवारच्या घटनेतील एक व आजच्या घटनेतील एक असे दोघा बेपत्तांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून ते आता जिवंत असण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान एसडीआरएफ च्या मयत जवानांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक, एक काँस्टेबल व वाहन चालकाचा समावेश आहे. या दुर्घटनेत एकूण तीन जवांनांसह इतर तीन युवकांचा अशा सहा जणांचा मृत्यु झाला आहे. तर दोन जण बचावले आहे.
अकोले तालुक्यातील सुगाव येथे दोन तरुण मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते. उष्णतेमुळे सागर पोपट जेडगुले (वय 25 रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे प्रवरा पात्रातील पाझर तलावाजवळ अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाझर तलावाच्या पडणार्या पाण्याच्या दाबाचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यापैकी सागर जेडगुले याचा मृतदेह काही वेळाने हाती लागला. तर अर्जुन याचा शोध घेण्यात आला, मात्र तो मिळुन आला नाही.
अर्जुनचा शोध लागत नसल्याने प्रांताधिकार्यांनी कळस येथून पट्टीचे पोहणार्यांना पाचरण करून अर्जुन याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू ठेवला. मात्र यश न आल्याने आज गुरूवारी सकाळी धुळे येथून एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. बुडालेल्या तरुणाच्या शोधासाठी धुळ्याहून आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन नदीपात्रात उतरले होते. मात्र नदीपात्रात मोठा भोवरा व खड्डा असल्याने यात एसडीआरएफची एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले. यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील कॉ. पंकज पंढरीनाथ पवार , कॉ. अशोक हिम्मतराव पवार अत्यावस्थ असून भांडकोळी रूग्णालयात त्यांचावर उपचार सुरू आहे. तर पोलीस उपनिरिक्षक प्रकाश नाना शिंदे, कॉ. राहुल गोपीचंद पावरा, चालक वैभव सुनील वाघ या एसडीआरएफच्या तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख – वाकचौरे (वय 38 मनोहरपूर) याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले यांचा अध्यापही शोध सुरू आहे.
बंधार्या लगत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अर्जुन रामनाथ जेडगुले आणि सागर पोपट जेडगुले हे दोघे पाण्यात बुडाले होते. यांच्या सोबत असलेल्या इतरांनी तसेच गावकरी, पोलीस आणि पट्टीचे पोहणार्यांनी शोध सुरु केला होता. त्यांना सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह शोधण्यात यश आले होते. तर अर्जुनचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफ ची टीम बोलवण्यात आली होती. मात्र त्यानंतर मोठी दुर्घटना घडली. या सर्व घटनेत एकूण 6 जणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला असून चार जणांचे मृतदेह शोधण्यास प्रशासनाला यश आले आहे. तर इतर दोन जण बेपत्ता असून त्यांचे मृतदेह अजूनही हाती लागले नाहीत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने बुडून मृत पावल्याने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी अकोले पोलीस, अकोले आरोग्य यंत्रणा व रुग्णवाहिका मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत. अजूनही नदी पात्रात बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु आहे. नदी पात्राच्या दोनही बाजूनी मयत झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला मदतीच्या सुचना केल्या. तसेच अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व प्रांताधिकारी शैलेश हिंगे, अकोले तहसीलदार यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदत कार्याला वेग मिळण्यासाठी प्रशासनाला सूचना व जिल्हा पातळीवरून अजून मदतीसाठी सूचना केल्या आहेत. या नदी पात्रात या अगोदर अशा घटना घडल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी अडविण्याचा बंधारा घातला आहे त्या ठिकाणी पाण्याचा वेग जास्त असल्याने तिथे अशा घटना घडत आहेत. अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.