महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोककला तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी पहिला पद्म पुरस्कार
आठवणी रघुभाऊच्या पद्म प्रवासाच्या…

संतोषभाऊ… आज आई पाहिजे होती… एक हुंदका बाहेर पडला आणि क्षणभर आम्ही दोघेही नि:शब्द झालो… रघुभाऊ फोनवर बोलत होते. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे मागील पंचावन्न वर्षांचा तमाशा रंगभूमीवरचा प्रवास आठवत भाऊ बोलत होते. सन २०१५ पासून तमाशा लोककलेला पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. सुरुवातीची अनेक वर्षे कांताबाई सातारकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. त्यानंतर दरवर्षी सप्टेंबर महिना आला की पद्मसाठीचा अतिशय क्लिष्ट असा फॉर्म भरायला सुरुवात व्हायची. यासाठी सुरुवातीला माझे मित्र ज्ञानेश्वर केदार यांच्या मदतीने अविनाश वर्पे यांच्याकडे हे काम चालायचे. पुढे या सगळ्याचा सराव झाला. दरम्यान कोविडमध्ये कांताबाई गेल्या. नंतर रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न सुरु झाला. तमाशा ही महाराष्ट्रातील सर्वाधिक भागात सादर होणारी सर्वाधिक लोकप्रिय कला. मात्र सिनेमावाल्यांनी ही कला इतकी बदनाम केली की काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता बहुतांशी पांढरपेशा लोकांनी तमाशा म्हणजे अतिशय वाईट असा समज करून घेतला. अशा परिस्थितीत पद्मची शिडी चढणे किती कठीण होते याचा विचार आपण करू शकाल.

तमाशाने महाराष्ट्राला काय दिले याबद्दल लिहायचे झाले तर तो स्वतंत्रपणे दोन तीन भागात लिहायचा विषय होईल. २०२२ नंतर रघुभाऊंना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न सुरु झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिफारस केली होती. त्याच्या पुढच्या वर्षी तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांनी आम्हाला रागुवीर खेडकर यांच्या पद्म पुरस्काराचा प्रस्ताव घेऊन थेट दिल्लीत यायला सांगितले. रघुभाऊचा हा पहिलाच विमान प्रवास होता. खासदार लोखंडे साहेबांनी आमचा उत्तम पाहुणचार केला. नवीन संसद भवन सुरु झाले त्याचा पहिलाच दिवस होता. त्या दिवशी देशाच्या विविध प्रांतातून महिलांना संसदेत निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इतरांना संसदेत प्रवेश दिला जाणार होता. मी, रघुवीर खेडकर, त्यांच्या तमाशाचे व्यवस्थापक शफी भाई आणि खासदार खासदार लोखंडे साहेब नवीन संसद भवनात गेलो. अकरा वाजता लोकांना संसदेत प्रवेश मिळणार होता.

आम जनतेला संसदेत प्रवेश देण्याचा पहिलाच दिवस असल्याने लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. स्वतः खासदार सोबत असल्याने आम्हाला रांगेत उभे रहावे लागले नाही. लोखंडे साहेब सोबत असल्याने आम्हाला इतरांपेक्षा पाच सात मिनिटे अगोदर प्रेक्षक गॅलरीत सोडले आणि आम्ही आत जात असताना तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले, आम लोगो के लिये आज ही संसदभवन मे प्रवेश दिया जा रहा है और आप पहले हो जो नये संसद भवन में प्रवेश कर रहे हो… हे ऐकताच अंगावर काटा आला. आपण एका इतिहासाचे साक्षीदार तर होत आहोतच परंतु नवी संसदेत प्रवेश करणारे देशाचे पहिले सर्वसामान्य नागरिक आहोत. संदेस्त गेल्यावर लोखंडे साहेबांनी केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी, खासदार श्रीनिवास पाटील यांना पद्मची निवेदने दिली. नंतर उद्योग भवनमध्ये तत्कालीन अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांना भेटून त्यांनाही निवेदन दिले. राणे साहेबांना भेटून बाहेर पडताना खासदार लोखंडे यांनी सांगितले की त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचे नियोजन ठरवून टाकले होते. भाऊ आणि आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागलो कारण त्याच दिवशी दुपारचे परतीचे तिकीट आम्ही अगोदरच काढून ठेवले होते. अखेरीस लोखंडे साहेबांना आम्ही सांगितेल, साहेब कालपासून तुम्ही आमच्यासाठी खूप धावपळ करत आहात, आमच्या अपेक्षेपेक्षाही तुम्ही खूप जास्त प्रयत्न केले आहेत , आता अमित शहा साहेबांना आमच्या वतीने तुम्ही भेटा, आम्ही दुपारी परत निघतोय. आज या निमित्ताने लोखंडे साहेबांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण होतेय.

मागच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे पद्मचा फॉर्म भरून पाठवला पण काहीच घडले नाही. यावर्षी मात्र काहीच करायचे नाही असे ठरवले परंतु ६ जानेवारीला शफीभाई माझ्याकडे आले आणि नगरला कलेक्टर ऑफिसला काही माहिती पाठवायची आहे तुम्हाला फोन येईल तुम्ही पुढची प्रोसेस करा असे सांगितले. अहिल्यानगरहून श्री गणेश माळवे यांनी अजिबात न कंटाळता एकेक माहिती मागवून घेतली, हे करताना पूर्वीचा अनुभव लक्षात घेता केवळ यंत्रवत माहिती देत होतो. परंतु चमत्कार झाला… माझे मेव्हणे जितेंद्र जोशी यांचा फोन आला, रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे…

जरावेळ सुन्न झालो, भाऊला फोन लावला, मी नमस्कार भाऊ म्हणताच समोरून भाऊचे पहिले वाक्य ऐकू आले, संतोषभाऊ आज आई पाहिजे होती… आणि एक हुंदका बाहेर पडला… भाऊ आज कौतुकाला, अभिनंदनाला शब्द नाहीत… फक्त एकच म्हणेन आपला अभिमान वाटतो भाऊ…रघु भाऊच्या पद्मच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार…

















