तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव

0
441

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने लवकरच भव्य सन्मान सोहळा -आ खताळ

संगमनेर | प्रतिनिधी
आयुष्यभर तमाशा या लोककलेचे जतन, संवर्धन करत कलाप्रेमींचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारे संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत, स्व. कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र तसेच अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून लोककला क्षेत्रातील सर्वोच्च असा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण तमाशा कला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर ही लोककलावंतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. शाहीर कवी अनंत फंदी, प्रथम महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर हे संगमनेरचे भूषण मानले जातात. या सर्व लोककलावंतांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने दरवर्षी लोककला पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मागील वर्षी स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दिला जाणारा लोककला पुरस्कार सातारा जिल्ह्यातील तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त करण्यात येत असून, त्या ठिकाणच्या रंगमंचाला स्व. कांताबाई सातारकर यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच स्व. कांताबाई सातारकर किंवा रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात यावा, यासाठी आमदार खताळ यांनी मंत्री उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामुळे तमाशा कलावंतांमध्ये तसेच खेडकर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

“माझ्या मातोश्री स्व. कांताबाई सातारकर यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे खेडकर परिवाराला केंद्र किंवा राज्य सरकारचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याच मागणीला यश येऊन मला पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण तमाशा कलेचा केंद्र सरकारने केलेला सन्मान आहे. हा पुरस्कार माझ्या आईला मिळायला हवा होता, मात्र तिच्या आशीर्वादामुळेच तो मला मिळाला, असे मी माझे भाग्य समजतो.”

— रघुवीर खेडकर (अध्यक्ष, अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटना, महाराष्ट्र राज्य)

“तमाशा सम्राट रघुवीर खेडकर व त्यांच्या मातोश्री स्व. कांताबाई सातारकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संगमनेरचे भूषण रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील पद्म पुरस्कार जाहीर केल्याने संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मला व सर्व संगमनेरकरांना अत्यंत आनंद होत आहे. लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सर्व संगमनेरकरांच्या वतीने त्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.”

— अमोल खताळ (आमदार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here