
प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
बसस्थानकातील सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
दैनिक (युवावार्ता) संगमनेर- शहराचे वैभव मानले जाणारे बसस्थानक आधीच अनेक समस्यांनी ग्रासले असताना, आता मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे मुक्तपणे वावरताना दिसत असून, हे कुत्रे थेट बसस्थानकातील बाकांवर प्रवाशांसोबत बसत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे.

एकापेक्षा अधिक कुत्रे एकाच ठिकाणी गोळा झाल्याने त्यांच्यात वाद, भांडणे होत असून, या भांडणांचा फटका थेट प्रवाशांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे मोकाट कुत्री बसस्थानकात प्रवाशांमधून सैरावैरा पळत असतात. त्याचबरोबर मोठमोठ्याने भुंकत असतात. त्यांच्या भुंकण्यामुळे बसस्थानकात मोठी अशांतता निर्माण होते. दरम्यान बसस्थानकात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या मोकाट कुत्र्यांमुळे अपघात किंवा चावण्याच्या घटनांचा धोका नाकारता येत नाही. सध्या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

या परिस्थितीत बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्था नेमके काय करते, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. कुत्र्यांचे टोळके येथे बिनधास्त भटकतात, धावून जातात तरी देखील बसस्थानक प्रशासन त्याकडे लक्ष देत नसतील तर प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते. काही प्रवासी तसेच तथाकथित दानशूर व्यक्ती कुत्र्यांना बिस्किटे, अन्न देतात. याशिवाय भिकाऱ्यांना मिळालेले अन्न देखील मोकाट कुत्र्यांना दिले जात असल्याने या ठिकाणी कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिणामी बसस्थानक हे कुत्र्यांचे आश्रयस्थान बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आधीच बसस्थानक परिसरात चोर, लुटारू, टवाळखोर, तसेच बेशिस्त वाहतुकीमुळे प्रवासी भयभीत असतात. त्यातच आता मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे प्रवाशांची धास्ती अधिकच वाढली आहे. रात्रीच्या वेळेस किंवा पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः या समस्येचा सामना करावा लागत आहे.
हे बसस्थानक जितके मोठे व सुसज्ज आहे, तितक्याच मोठ्या समस्या येथे निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या सर्व समस्यांकडे प्रशासन डोळे झाकून पाहत असल्याचा आरोप प्रवासी व नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित नगरपालिका, एसटी महामंडळ आणि पशुवैद्यकीय विभागाने तातडीने उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे


















