सेवा समितीच्या दणदणीत यशानंतर स्वीकृत नगरसेवकांची घोषणा

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर –
संगमनेर नगरपरिषदेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीने दैदिप्यमान कामगिरी केली. नगराध्यक्ष पदासह तीस पैकी तब्बल सत्तावीस नगरसेवक निवडून आले. तर विरोधी महायुतीला केवळ एक जागा मिळाली. या दैदिप्यमान यशामुळे संगमनेर नगरपरिषदेत स्विकृत नगरसेवक पदाची संधी कुणाला मिळणार याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष होते. अखेर आज सोमवारी दुपारी या पदासाठी काँग्रेस शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे, शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या रचनाताई मनिष मालपाणी व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते जावेद पठाण यांनी आपले अर्ज दाखल केले. तसेच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आ. सत्यजित तांबे यांनी केली.

या निवडीमुळे या होणार्या स्विकृत नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये प्रचंड जल्लोष निर्माण झाला तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वी ज्यांना शब्द दिला होता मात्र आता संधी मिळाली नाही त्यांच्यामध्ये मात्र कमालीची नाराजी देखील पहायला मिळाली.
सेवा समितीला मोठे यश मिळाल्याने स्विकृतसाठी इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली होती. आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेकांनी बाळासाहेब थोरात व आ. तांबे यांच्याकडे आग्रह धरला होता मात्र जागा तीनच असल्याने पक्षश्रेष्ठी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज जाहीर झालेल्या तीन पैकी दोन नावे चर्चेत होती मात्र रचनाताई मालपाणी यांचे अचानक नाव समोर आल्याने अनेकांना धक्का बसला. अनेक वर्षांनंतर मालपाणी परिवारातील सदस्य नगरपालिकेत दिसणार आहे. रचना मालपाणी या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. इनरव्हील क्लबच्या त्या मार्गदर्शिका आहेत. ग्रामिण भागातील लहान मुलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी त्या एनजीओ चालवितात. रचना मालपाणी या वृक्षप्रेमी असून गोमातेसाठीही त्या कार्यरत आहेत. उच्चशिक्षित, उत्कृष्ट वक्त्या, कवीयित्री असलेल्या रचना मालपाणी यांच्या नगरपरिषदेतील निवडीमुळे सर्वांना आनंद झाला आहे.


सोमेश्वर दिवटे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहे तसेच ते माजी नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून ते निवडणूकीसाठी इच्छुक होते. मात्र ही जागा ऐनवेळी किशोर पवार यांना दिल्याने त्यांनी माघार घेत निवडणूकीत पक्षासाठी प्रचार यंत्रणा संभाळली. यापुर्वी देखील त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे पक्षाने त्यांची स्विकृत नगरसेवकपदी निवड करत त्यांचा सन्मान ठेवला आहे. तसेच अल्पसंख्याक समाजातून जावेद पठाण यांना संधी देण्यात आली आहे.

जावेद पठाण


















