सुकेवाडीत सव्वा कोटींचा गांजा जप्त

0
383

संगमनेरमध्ये अवैध धंद्यांचे ‘भीषण साम्राज्य’!

ड्रग्ज, दारू, जुगाराच्या सावलीत शहराची कायदा-सुव्यवस्था कोलमडतेय!

कुठे चाललाय संगमनेर माझा?

संगमनेर (प्रतिनिधी) – शहरात दारू, जुगार, गुटखा, मटका यांसारखे अवैध धंदे उघडपणे चालू असल्याचे चित्र नागरिकांना रोज दिसत असतानाच आता ड्रग्जचे जाळेही शहराला धोकादायकपणे ग्रासत असल्याचे वास्तव समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच कोट्यवधींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त होऊन शहर हादरले होते, पण त्यानंतर पुन्हा एकदा संगमनेरमध्ये अवैध धंद्यांचे भूयार किती खोलवर गेले आहे याचा पुरावा गुरुवारी सकाळी मिळाला. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (नाशिक) आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या सुकेवाडी येथे टाकलेल्या धाडीत तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीचा ४५६ किलो गांजा जप्त झाला, आणि परिसरात भीती व संतापाची एकच लाट उसळली.


संगमनेर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकेवाडी येथील आरोपी तुषार उत्तमराव पडवळ उर्फ ‘दमल्या’ याच्या घरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याची खात्रीशीर ‘टिप’ नाशिक टास्क फोर्सला मिळाली होती. त्यानुसार पहाटेच संपूर्ण पथक संगमनेरमध्ये दाखल झाले आणि शहर पोलिसांच्या मदतीने दमल्याच्या घरावर धाड टाकण्यात आली. छाप्यात घराच्या आत आणि घराबाहेर उभ्या असलेल्या अ‍ॅपे रिक्षामध्ये एकूण १ कोटी १४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा प्रचंड गांजा साठवलेला आढळला. अशा प्रमाणात अमली पदार्थ पाहून अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांनाही क्षणभर थक्क व्हावे लागले. हा साठा पाहताच पोलिसांनी तात्काळ परिसर सील केला, आणि काही वेळातच सुकेवाडी गाव सैनिकी छावणीसारखे दिसू लागले. पोलिस वाहनांची वर्दळ, वरिष्ठ अधिकार्‍यांची हजेरी, सर्वत्र वाढवलेली नजर व गावकऱ्यांचा जमलेला जनसमुदाय या सगळ्यांमुळे गावात काय भलतंच घडलंय अशी चर्चा वाऱ्यावर पसरली.


या कारवाईची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, नाशिक टास्क फोर्सचे डीवायएसपी गुलाबराव पाटील, श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पो.नि. भागवत व्यवहारे, पो.नि. पंकज खरे, पो.उपनि. श्रीकांत सावंत, पो. नाईक माळी, पो. हेड कॉ. विश्‍वास बेरड, हवलदार डामले, पो. कॉ. गणेश महाले, वैभव पांढरे, गणेश मिसाळ, पो. कॉ. चव्हाण तसेच पुणे नारकोटिक्स विभागाचे SP स्वतः घटनास्थळी धावून आले.
दुसरीकडे, छाप्याची माहिती मिळताच आरोपी तुषार उर्फ दमल्या घरातून पसार झाल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून परिसरातील सर्व हालचालींवर कठोर नजर ठेवली जात आहे.


दरम्यान, या प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, संगमनेर शहरात ड्रग्जचे जाळे नक्की किती खोलवर गेले आहे? काही दिवसांपूर्वी शहरात जवळपास एक कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त झाला होता आणि एका व्यापाऱ्याकडे देखील एमडी ड्रग्ज सापडले होते. आता सव्वा कोटींचा गांजा सापडल्याने शहरातील तरुण पिढी, कॉलेज परिसर, गावाकाठचा परिसर या सर्वांवर अमली पदार्थांच्या सावलीने विळखा घातल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.


हुक्का पार्लर, एमडी ड्रग्ज, गांजा, अवैध दारू, कत्तलखाने अवैध धंद्यांची ही भयावह यादी आधीच नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरलेली होती. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही या धंद्यांविरोधात प्रचंड तक्रारी समोर आल्या होत्या. तरीही परिस्थितीत काहीच सुधारणा न झाल्याने आता संगमनेरच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक गुन्ह्यांचे तपास लागायला महिनोन्महिने लागतात, काही आरोपी सहज पळून जातात, आणि नंतर गुन्हे पुन्हा-पुन्हा उघडकीस येतात यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.


या कारवाईनंतर एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर आली आहे संगमनेर अवैध धंद्यांच्या ‘कुंडात’ उतरतोय, आणि आता कठोर व निर्णायक हस्तक्षेपाशिवाय स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. सुकेवाडीत सव्वा कोटींचा गांजा सापडणे हा फक्त एक साठा नाही तर शहराच्या सुरक्षेला, समाजाच्या आरोग्याला आणि कायदा-सुव्यवस्थेला लागलेली लाल इशाऱ्याची घंटा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here