
राष्ट्रवादीचीही नाराजी, 09 नगरसेवक उमेदवारांचा अर्जही कायम
शिवसेना (शिंदे गट) शहर महिला आघाडी प्रमुख यांच्यासह पाच महिला सदस्यांचाही राजीनामा
नगरपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक धक्कादायक घडामोडी, तडजोडी घडल्याने अनेक प्रभागात आता सरळ संगमनेर सेवा समिती विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. अनेक प्रभागात तिरंगी लढतीतील प्रभावी उमेदवारांनी माघार घेतल्याने मोठे आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे. अर्ज भरल्यानंतर दिनांक 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान नगराध्यक्षपदासाठी उभे असलेल्या 16 पैकी तब्बल सात जणांनी माघार घेतली आहे तर आजा माघारीच्या शेवटच्या दिवशी 36 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने माघार उमेदवारांची एकुण संख्या 43 झाली आहे. दरम्यान भाजपच्या माजी नगरसेविका मेघा दिपक भगत यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वरिष्ठांच्या सुचनेनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांनी आपल्या उमेदवाराच अर्ज मागे घेतला तर भाजपकडुन दाखल असलेला सुजाता देशमुख यांनीही आपला नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे आणि शिवसेनेच्या सुवर्णा खताळ आणि अपक्ष मेघा भगत असा त्रिकोणी मुकाबला होणार आहे.
संगमनेर सेवा समिती (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) चे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी तिकिट वाटपात दाखवलेला चाणक्षपणा व त्यानंतर आपल्या बंडखोरांना थोपवण्यात त्यांना आलेले यश याचे कौतुक केले जात आहे. दुसरिकडे महायुतीत सुरु असलेला सावळा गोंधळ अद्यापही सुरुच असल्याचे दिसत आहे.
महायुतीचे नाराज इच्छुक आता सोशल मिडीयावर अतिशय भावनिक आणि तळमळीने भावना व्यक्त करत आता वरिष्ठांवर रोष व्यक्त करत आहेत.

संगमनेर (प्रतिनिधी) – नगराध्यक्षपदासह अनेक प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने महायुतीला खिंडार पडले होते. तर आता भाजपाच्या मेघा दिपक भगत यांनी नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केल्याने महायुतीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. महायुतीच्या फुटीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मेधा भगत या भाजपच्या मागिल टर्मच्या एकमेव महिला नगरसेवक आहेत.

महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुती एकत्र राहील, अशी अपेक्षा होती. मात्र ही उमेदवारी सर्वसमावेशक नव्हती असे महायुतीच्याच गोटातून बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे महायुतीचे गणित सुरवातीलाच बिघडले होते. दरम्यान भाजपाच्या मेघा भगत यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. माघारीपर्यंत हा अर्ज माघारी घेतला जाईल असे बोलले जात होते. परंतु आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी देखील हा अर्ज माघारी न झाल्याने महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नाही यावर शिक्कामोर्तब झाले.

नगराध्यक्षपदासाठी संगमनेर सेवा समितीच्या डॉ. मैथिली तांबे, महायुतीच्या शिवसेनेच्या सुवर्णा खताळ, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रूपाली कपिलेश्वर पवार या तीन मजबूत उमेदवारांसह काही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आल्याने संगमनेरातील लढत चुरशीची होण्याचे चित्र निर्माण झाले होते. काही अपक्ष व भगत हे अर्ज मागे घेतील असे बोलले जात असताना राष्ट्रवादीच्या पवार यांनी अर्ज मागे घेतला परंतु भगत यांनी कायम ठेवल्याने महायुतीतील शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. आता हा अर्ज केवळ भगत यांचा आहे की भाजपचा याची मोठी चर्चा शहरात होत आहे.
भगत यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत मतविभाजनाचा धोका निर्माण झाला असून याचा थेट परिणाम शिवसेनेच्या उमेदवाराला बसू शकतो.
शिवसेना महिला शहर आघाडी प्रमुख वैशाली तारे यांच्यासहित तीन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
यातच आमदार अमोल खताळ यांची साथ शिवसेना महिला आघाडीच्या काही उमेदवारांनीही सोडल्याचेही वृत्त हाती येत आहे. शिवसेना शहर महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली अशोक तारे यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख यांना आपला राजीनामा पत्राद्वारे पाठविला आहे. सोबत मनिषा अंबादास पंधारे, वंदना बाळु भुसे, ज्योती सागर पंधारे यांनी राजीनामा दिला आहे. वैशाली अशोक तारे यांनी सांगितले की, मी शिवसेना महिला शहर आघाडीची शहरप्रमुख म्हणून १७ नोव्हेंबर २०२१ पासून काम बघते आहेत. आमदार खताळ यांच्या विजयासाठी आम्ही संपूर्ण ताकद पणाला लावली. पंरतू त्यांना आता आमची जाणीव राहिली नाही. त्यांची पत्नीच आता सर्व कामकाज बघते आहे. आमदार अमोल खताळ आम्हाला विचारत सुध्दा नाही. आमदार अमोल खताळ यांनी आत्तापर्यंत केले ते पूरे झाले आणि यापुढे आम्ही त्यांच्यासाठी काम करणार नाही. याऊलट त्यांचा सर्व पॅनेल पडावा अशीच मी अपेक्षा करते असेही वैशाली तारे यांनी सांगितले.

कोण आहेत दिपक आणि मेघा भगत
दिपक भगत हे भाजपचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आहेत. संगमनेर भाजपा मध्येही त्यांचा मोठा सक्रीय सहभाग आहे. २०१६ च्या निवडणुकीमध्ये अनेक भाजप उमेदवारांमध्ये त्यांच्या पत्नी मेघा भगत या एकमेव विजयी झाल्या होत्या. त्यांनी विरोधक म्हणून नगरपालिकेत प्रभावी कामदेखील केले होते. यावेळी त्यांना प्राधान्यक्रमाने उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते मात्र नगरसेवकपद आणि नगराध्यक्ष अशा दोन्ही ठिकाणी त्यांना नाकारल्याने त्यांचे व भाजपाचे कट्टर समर्थक यांच्यात मोठी नाराजी पसरली होती. भगत यांना जाणीवपूर्वक डावलल्याने त्यांनी नगराध्यक्षपदाचा आपला अर्ज कायम ठेवला आहे. याबाबत दिपक भगत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमच्यावर अन्याय झाला आहे. ही उमेदवारी भाजपाची नाही तर आमची वैयक्तिक आहे. परंतू आमची ताकद आता निकालातूनच जनतेसमोर येईल असेही भगत यांनी सांगितले.


वरिष्ठांच्या आदेशाने अर्ज मागे – कपील पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यांचा मोबाईल कॉल आल्यानंतर आणि त्यांनी महायुतीला अडचण नको अशी भूमिका मांडल्याने आपण नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेले रूपाली पवार यांचे पती व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपील पवार यांनी दिली. अर्ज माघारीसाठी आमदार अमोल खताळ यांनीही विनंती केली त्यामुळे नगराध्यक्षपदाचा जरी अर्ज मागे घेतला असला तरी शहरात ११ ठिकाणी उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुक लढविणार आहे असे पवार यांनी सांगितले.

एकूण माघार
१९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान
नगराध्यक्ष – ७
सदस्य – ३६
एकूण – ४३
आजचे माघारी अर्ज (२१-११-२०२५)
नगराध्यक्षपदाचे माघारी अर्ज
- केसेकर सुनिता कैलास (अपक्ष)
- गलांडे रेखा संपत (अपक्ष)
- बेपारी शबाना रईस (अपक्ष)
- रूपाली कपिलेश्वर पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
- शेख अफसाना इलियास (अपक्ष)
- सुजाता राजेंद्र देशमुख (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. १ (अ)
- फड वैष्णवी संजय – (अपक्ष)
प्रभाग क्र. ३
- सुनंदा मच्छिंद्र दिघे – (अपक्ष)
प्रभाग क्र. ४ (अ)
- कडलग विद्या प्रकाश – (अपक्ष)
- गायकवाड चंद्रकला शंकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
प्रभाग क्र. ४ (ब)
- आहेर सतिष भाऊसाहेब – (अपक्ष)
प्रभाग क्र. ५ (ब)
- पवार किशोर सावळेराम – (अपक्ष)
प्रभाग क्र. ६ (ब)
- कानकाटे सदाशिव सोमनाथ – (अपक्ष)
- भुजबळ संतोष रमेश – (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
- राहुल देवराम म्हस्के – (अपक्ष)
प्रभाग क्र. ७ (ब)
- कोठवळ आशिष तुकाराम – (अपक्ष)
- भरीतकर माधव त्रिंबक – (अपक्ष)
- मंडलिक किशोरी सुभाष – (अपक्ष)
- शिंदे नारायण सावळेराम – (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ (अ)
- अरगडे प्रिती अनुज – (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ (ब)
- कुक्कर भगवान रामदास – (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ (अ)
- सय्यद अजमद दाऊद – (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ (ब)
- शेख मुस्कान मुजफ्फर – (अपक्ष)
प्रभाग क्र. १० (अ)
- शेख दिलशाद अजीज – (अपक्ष)
प्रभाग क्र. १० (ब)
- इनामदार एजाज जमिल – (अपक्ष)
प्रभाग क्र. ११ (ब)
- शेख रईस मुख्तार – (अपक्ष)
- शोएब मुजीब शेख – (अपक्ष)
- सय्यद अन्सार मकबूल – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
प्रभाग क्र. १२ (अ)
- बेपारी शफी हाजीपापभाई – (अपक्ष)
- बेपारी तवरेज मो. रफिक – (अपक्ष)
प्रभाग क्र. १२ (ब)
- अमृतवाड दिपा व्यंकटेश – (अपक्ष)
प्रभाग क्र. १३ (अ)
- घोगले रूपाली विजय – (अपक्ष)
- जेधे सुनिता कुंदन – (अपक्ष)
प्रभाग क्र. १३ (ब)
- उपरे मुकुंद मुरलीधर – (अपक्ष)
- डुकरे अमोल राजेंद्र – (अपक्ष)
- वाड़ेकर प्रशांत पद्माकर – (अपक्ष)
प्रभाग क्र. १४ (ब)
- पठाण अकिल नजीरखान – (अपक्ष)
प्रभाग क्र. १५ (अ)
- मोमीन जैद जुनेद – (अपक्ष)
प्रभाग क्र. १५ (ब)
- शेख जुलेखा फैरोज – (अपक्ष)

















