
जाहिरनाम्यामध्ये जनसामान्यांच्या सूचना घेऊनच पुढची वाटचाल; QR स्कॅन करून फॉर्म भरण्याचे आवाहन
विकासाच्या मुद्द्यावरच नगरपरिषदेची निवडणुक
व्हिजन विरूध्द डिव्हीजन पार्टीची ही लढत
संगमनेर (प्रतिनिधी) – मागील अनेक वर्षांपासून आम्ही केलेली विकासाची कामे आणि पुढील कामाचे आमचे असणारे व्हिजन याच्या जोरावरच आम्ही संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. गंगामाई मंदिर परिसरामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाविण्यपूर्ण पध्दतीने आ. सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीच्या तयारीचे विश्लेषण पत्रकारांसमोर मांडले. संगमनेर 2.0 या नवीन संकल्पनेमध्ये आम्ही संगमनेरमधील तसेच जे संगमनेरकर देशात किंवा देशाबाहेर आहेत त्यांच्या सूचना घेणार आहोत. संगमनेर शहराची पुढची आवृत्ती आणण्याची जबाबदारी आम्ही नव्या पिढीने हाती घेतली आहे. संगमनेरच्या विकासाचा पुढील 50 वर्षांच्या विकासाचा नवीन आराखडा कसा असला पाहिजे हे या जाहिरनाम्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. श्रमिक-कष्टकरी, हमाल-माथाडी, दीन-दुबळ्या माणसांपासून, मध्यमवर्गीय, नोकरदार, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, कारखानदार, विद्यार्थी, महिला, अबालवृध्द, ज्येष्ठ नागरिक या सर्वांचे मत जाणून घेवून संगमनेरकरांचा जाहिरनामा आम्ही बनवणार असल्याचे यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी क्यू-आर कोड दाखवला. या क्यू-आर कोडमध्ये फॉर्मच्या माध्यमातून ही मते जाणून घेतली जाणार आहेत. हा केवळ जाहिरनामा नसेल तर कामाची ब्ल्यू-प्रिंट असेल

संगमनेरकरांच्या दृष्टीने पिण्याचा पाण्याचा अतिशय महत्वाचा प्रश्न आम्ही सोडवला. मुबलक आणि स्वच्छ पाणी आज संगमनेरकरांना मिळते आहे. गार्डन सिटीच्या रूपाने आम्ही 35 हून अधिक गार्डन उभारून संगमनेर ग्रीन सिटीला हातभार लावला आहे. संगमनेरमध्ये अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारले आहे. नाशिकहून किंवा पुण्याहून येताना लक्ष्मी रोड अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधतो. लक्ष्मी रोडवरून जाताना एखाद्या महानगरामध्ये आल्यासारखे वाटते. या सर्व कामांच्या शिदोरीवरच आम्ही नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. 50 वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढील 5 वर्षांचा आमचा रोडमॅप तयार आहे. जनतेच्या मनातील भावना आणि सूचना पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये आम्ही घेणार असून त्यातून ही निवडणुक आम्हाला यश देईल असे आ. तांबे यावेळी म्हणाले.
नगरसेवक आणि नगराध्यक्षांची निवड –

आमचे नगरपरिषदेचे उमेदवार हे जनतेच्या मनातीलच असतील. शहरविकास आघाडी असणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार हा निर्णय आपण योग्य वेळी घेणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती जसे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आई दुर्गाताई तांबे, वडिल मा.आ. सुधीर तांबे आणि मैथिली तांबे यांच्या संगमनेरमध्ये प्रचंड जनसंपर्क आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार देताना मैथिली तांबे किंवा अन्य उमेदवाराचा विचार हा जनतेचा कौल घेतला जाईल आणि त्यानंतरच उमेदवार दिला जाईल असे ते यावेळी म्हणाले.
मागील 4 वर्षे नगरसेवक आणि नगराध्यक्षच नसल्यामुळे शहराची घडी बिघडली –
मागच्या 4 वर्षांमध्ये संगमनेर शहारमध्ये नगराध्यक्षच नाही. कोणताही नगरसेवक नाही. प्रशासकीय राज आल्यामुळे शासनाचा सुध्दा कंट्रोल नगरपालिकेवर राहिला नाही. त्यामुळे शहराची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये 4 मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पदभार स्वीकारला, पहिली मीटिंग झाली आणि लगेच पुढची ऑर्डर निघाली अशी अवस्था आहे. बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी जनता नक्की आमच्या पाठिशी आहे असे आ. तांबे म्हणाले.
व्यापाऱ्यांना त्रास, अनधिकृत फ्लेक्स, ड्रग्जचा वाढलेला वापर, गुन्हेगारी –
संगमनेरमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर स्थिती बदलली आहे. आता शहाराची शांतता, सुव्यवस्था कोण राखू शकेल? छोटे व्यापारी, उद्योजक यांना कोण संरक्षण देऊ शकतो? हे जनतेला आता ठरवायचे आहे. संगमनेरमधील अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे अतिशय बकाल वातावरण तयार झाले होते. आमची सत्ता आल्यास आम्ही स्वत: अनधिकृत फ्लेक्स लावू देणार नाही आणि कोणाला लावू देणार नाही. शहराचे विदृपीकरण होऊ देणार नाही. मागच्या काही काळामध्ये अचानकपणे ड्रग्जचा वापर वाढला आहे. गांजा सेवन वाढले आहे. जाणता राजा मैदानवरच लोक गांजा, दारू, ड्रग्जचे खुलेआम सेवन करतात. लोक आता अक्षरश: शेकोटी करून बसायला लागले आहेत. असे मी याआधी कधीही बघितले नव्हते. अकोले नाका परिसर,मालदाड रोड परिसरात प्रचंड दहशत माजली आहे. पोलिसांचा आता वचकच राहिला नाही. पोलिस स्टेशनमध्येच त्यांच्यासमोर आता मारामाऱ्या होतात. शहरातील गुन्हेगारीवर कोणाचा वचक राहिला नाही. गावगुंडांच्या भितीने संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला जाणारी मंडळी आता घरीच थांबतात. पीआय यांच्या खुर्चीला लाथ मारण्यापर्यंत आता मजल गेली आहे, त्यामुळे जनतेने पुढील निर्णय घ्यायचा आहे.
निधी वाटप, श्रेयवाद आणि मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट
शासकीय स्तरावरील प्रश्न, सरकारी कामे, निधींचे वाटप, राज्यस्तरावरील प्रश्न यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या पत्रावर, माझ्या पाठपुराव्यामुळे जो निधी आला त्याचे श्रेय माझेच आहे. आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून जो निधी आला याचे श्रेय त्याने देण्याचे मोठेपण माझ्याकडे आहे. यामध्ये श्रेयवाद करण्याचे कारण नाही. ज्यामुळे तालुक्याला फायदा होते तेथे श्रेयवाद काय कामाचा. प्रत्येक आमदाराला 50 किमी पाणंद रस्त्यांचा निधी देण्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगवले यांनी दिला आहे. आ. अमोल खताळ यांना त्यांच्या 50 किमीचे पाणंद रस्ते मिळाले. मला माझ्या 50 किमीचे मिळाले. त्यांनी त्यांची बातमी सगळीकडे पसरवली. आम्ही त्या वेळेस काही बोलले नाही. आमची 50 किमीची बातमी ज्यावेळी आली तेव्हा ते पत्र आम्हीच दिले आहे असे खताळांनी पसरवले. सोशल मीडियामध्ये ट्रोलिंग सुरू झाले. मी मात्र अशा प्रकारचे गलिच्छ ट्रोलिंग करणार नाही.
व्हिजन पार्टी आणि डिव्हीजन पार्टी अशी लढत
आमची बाजू व्हिजन असलेली आहे तर समोरची बाजू ही डिव्हीजन असलेली पार्टी आहे. व्हिजन विरूध्द डिव्हीजनची ही लढाई आहे. आता संगमनेरकरांना निर्णय घ्यायचा आहे की हे शहर आपल्याला अजून पुढे घेवून जायचे आहे. आम्ही आता व्हिजनरी आणि प्रचंड काम करणार आहोत. तरी संगमनेरकरांनी आमच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन यावेळी सत्यजीत तांबे यांनी केले.






















