
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी पुढाकार
युवावार्ता (प्रतिनीधी) संगमनेर: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आणि शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पणन मंत्री मा. जयकुमार रावल यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत बाजार समितीच्या एकूण कार्यपद्धतीत अधिक कार्यक्षम बदल घडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.आमदार तांबे यांनी बाजार समितीच्या आर्थिक सुविधा अधिक सक्षम करण्याची तसेच शेतकऱ्यांना थेट फायदा मिळेल अशा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली. बाजार समितीतील पारदर्शक व्यवहार व्यवस्था, हमाल-माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, व्यापाऱ्यांसाठी सुलभ सुविधा तसेच शेतकऱ्यांना योग्य दरात बाजारपेठ उपलब्ध करून देणे या विषयांवर आमदार तांबे यांनी सविस्तर मुद्दे मांडले.

या चर्चेत बाजार समितीच्या विकासासाठी काही महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावण्यात आले असून उर्वरित विषयांवर लवकरच निर्णय होईल असे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्या तालुक्याच्या आर्थिक कण्यासारखी आहे. तिच्या कार्यक्षमतेत वाढ झाली तर शेतकरी आणि व्यापारी दोघांच्याही हिताचे मोठे काम होईल. मी जे प्रश्न मांडले आहेत, त्यावर येणाऱ्या काळात सकारात्मक आणि ठोस कार्यवाही होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. – आमदार सत्यजीत तांबे