सरकारी जमिनींवर सोसायटी प्रकल्पाची उभारणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
आ. सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने संगमनेरचे अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या माध्यमातून प्रांत कार्यालय, संगमनेर येथे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला कामगार उपस्थित होत्या. तसेच गटविकास अधिकारी सिनारे साहेब, नगर परिषद मुख्याधिकारी पवार मॅडम तसेच प्रांत कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

2007 मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या काळात संजय गांधी नगर आणि राजीव गांधी नगर येथील जमिनी जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आल्या होत्या जेणेकरून घरकुल योजनेसाठी त्यांचा वापर करता येईल. परंतु उच्च बांधकाम खर्च आणि तात्पुरत्या निवासाच्या अडचणींमुळे तो प्रकल्प थांबला होता. आता तोच प्रकल्प नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्धार आ. तांबे यांनी व्यक्त केला.
आ. तांबे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या जीवनाचा उल्लेख करत भावनिक शब्दांत सांगितले, तुम्ही दररोज इतरांच्या घरात काम करतात. साफसफाई, स्वयंपाक, सेवा. मोठ्या-मोठ्या बंगल्यांमध्ये तुम्ही स्वच्छता करता, पण स्वतःच्या राहण्यासाठी छत नाही, हे अन्यायकारक आहे. तुमचंही एक स्वप्न आहे ‘आमचं स्वतःचं घर असावं!’ हे स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू. त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांमधून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये घर मिळवून देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरातील सरकारी जमिनींचा सर्वेक्षण सुरू करण्यात आला आहे. या जमिनींवर सोसायटीच्या माध्यमातून घरकुल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक महिलेला सोसायटीची सभासदता मिळणार असून नियमानुसार लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येईल. शहरात प्लॉट उरले नाहीत, पण आजूबाजूच्या गावांमध्ये सरकारी जमिनी आहेत. त्या जमिनी कलेक्टर साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळवू, असे आ. तांबे यांनी सांगितले तसेच जाहीर केले की, तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात महिलांसाठी सुरक्षित निवास, मुलांसाठी खेळाचे गार्डन व अंगणवाडी आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा असतील. तुमचं नुकसान वाया जाणार नाही. तुम्ही आज काम सोडून आलात, तुमचा वेळ आणि मेहनत आम्हाला माहीत आहे. त्या त्यागाचं आम्ही मोल देऊ, असे त्यांनी महिलांना आश्वस्त केले.
