पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू

0
285

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये काहीशी सुस्ती आली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करताच संगमनेरात पुन्हा राजकारणाचे तापमान वाढले आहे. दिवाळीनंतर या निवडणुकांची रणधुमाळी प्रत्यक्षात सुरू होणार असली तरी आत्तापासूनच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
संगमनेर मतदारसंघात आ. अमोल खताळ यांच्या माध्यमातून महायुतीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे याआधी काँग्रेसकडे झुकलेले काही नाराज कार्यकर्ते आता महायुतीचा दरवाजा ठोठावत आहेत. महायुतीकडूनही या अतृप्त इच्छुकांना आपल्याकडे खेचण्यासाठी तयारी सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या चार दशकांपासून संगमनेर तालुक्यात एकहाती सत्ता राखली. मात्र यंदाच्या विधानसभेत काँग्रेसच्या गोटाला मोठा धक्का बसला. आता हा धक्का भरून काढण्यासाठी थोरात-तांबे परिवार पुन्हा एकदा संघटन बळकट करण्याच्या तयारीला लागला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये मोठे काम केले आहे. तर आ. सत्यजित तांबे हे देखील मोठा विकासनिधी संगमनेरसाठी आणत आहे. मात्र ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनी देखील विकासात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मतदार कोणता पर्याय निवडता यावर पुढील राजकारण ठरणार आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात आणि सौ. दुर्गाताई तांबे हे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुन्हा संघटनेत चैतन्य आणत आहेत. विधानसभेला गाफील राहिलो, पण स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये काँग्रेस पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्‍वास काँग्रेस व महाविकास आघाडी नेत्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की, जनता आता भुलथापांना बळी पडणार नाही. विधानसभेत परिवर्तन केले आणि आता नगरपालिकेतही भगवा फडकणार. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका आता केवळ सत्तास्पर्धा नसून – थोरात, तांबे, विखे आणि खताळ यांच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार आहेत. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद – सर्व राजकीय शस्त्रांचा वापर या रणधुमाळीत होणार हे निश्‍चित!

संगमनेर नगरपरिषदेवर काँग्रेसचा वर्चस्व असतानाही यंदा परिस्थिती काहीशी वेगळी आहे. नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. काँग्रेसकडून डॉ. जयश्री थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, मैथिली तांबे या प्रतिष्ठित महिलांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे महायुतीकडे मात्र ओळख असलेल्या सक्षम महिला उमेदवारांचा शोध सुरू आहे. नगराध्यक्षपद भाजपला मिळण्याची शक्यता असल्याने भाजप गोटातही हालचाली वाढल्या आहेत. दिवाळीपर्यंत दोन्ही गटांकडून उमेदवारांच्या नावांवर जोरदार चर्चा होणार आहे. मात्र दिवाळीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. संगमनेरच्या राजकारणातील ही प्रतिष्ठेची निवडणूक कोणाच्या बाजूने झुकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here