संगमनेरचे सीसीटीव्ही मरणासन्न; सुरक्षा रामभरोसे

0
344

सुरक्षेबद्दलच्या या अनास्थेवर दोन्ही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे

काही कॅमेरे आणि हार्डवेअर चोरीला

संगमनेर (प्रतिनिधी) – अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर हे व्यापारी, शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. इथली बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात गजबजलेली आहे. शेतकरी, व्यापारी, ग्रामिण भागातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे येत असल्याने शहर कायमच गजबजलेले असते. मात्र एवढ्या गर्दीच्या व संवेदनशील शहराची सुरक्षा मात्र रामभरोसे असल्याचे धक्कादायक वास्तव युवावार्ताच्या पाहणीत समोर आले आहे.
शहरातील प्रमुख ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बरेचसे बंद असून, कार्यरत असलेले काही कॅमेरे योग्य दिशेत न बघता माना टाकून निष्क्रिय झाले आहेत. काहींचे तर रेकॉर्डिंगच होत नाही. त्यामुळे पोलिसांच्या गुन्हे तपासात मोठी अडचण निर्माण होत आहे.

राजस्थान युवक मंडळाने केली होती सुरुवात
संगमनेर शहरात सीसीटीव्ही प्रणाली राजस्थान युवक मंडळ आणि संगमनेर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाली होती. चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसवून ठेकेदाराला संपूर्ण पेमेंट देण्यात आले. पोलिस स्टेशनमध्ये मॉनिटरिंगसाठी स्क्रीनदेखील बसवण्यात आले होते. सुरुवातीला या यंत्रणेचा चांगला उपयोग झाला; मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टोरेज आणि कॉन्फिग्रेशनसाठी लागणार्‍या सर्व्हरचे पैसे पोलीस यंत्रणेकडून न मिळाल्याने ठेकेदाराने सर्व्हरच परत नेला.
यानंतर यंत्रणेचे देखभालकाम (मेंटेनन्स) पूर्णपणे थांबले. काही कॅमेरांच्या सेटिंग्ज बदलल्या, दिशा बदलली, इंटरनेट व्यवस्थित न जोडल्याने अनेक कॅमेरे बंद पडले. त्यानंतर हा ठेका नगरच्या एका ठेकेदाराला देण्यात आला, पण काम व्यवस्थित झाले नाही.

कॅमेरे आणि हार्डवेअरच चोरीला
ज्या सीसीटीव्हीद्वारे सुरक्षा आणि चोरीला आळा बसतो तेच सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेल्याच्याही घटना झाल्या आहेत. सीसीटीव्हीबरोबर असलेले काही हार्डवेअर देखील चोरीला गेल्याचे समजते आहे. जे कॅमेरे चोरीला गेले आहेत त्याची दखल कोणीच घेतलेली नाही. संगमनेर पोलिस स्टेशन, नगरपालिका यांनी नंतर कुठल्याही प्रकराचे नियंत्रण ठेवले नाही.

पोलिसांसाठीही मोठी डोकेदुखी
आज परिस्थिती अशी आहे की – शहरातील बरेच कॅमेरे बंद आहेत. जे चालू आहेत त्यांचे रेकॉर्डिंग नीट होत नाही. बसस्थानक, बाजारपेठ, महत्त्वाचे चौक, नवीन नगर रोड, मेन रोड, तीन बत्ती चौक , अकोले नाका, शाळा-कॉलेज परिसर, एटीएम, बँका अशा संवेदनशील ठिकाणांवरील सर्व्हिलीयन्स ठप्प आहे यामुळे पोलिसांच्या तपासात व गर्दी नियंत्रणात मोठी अडचण निर्माण होत आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी, उर्स, यात्रांसारख्या गर्दीच्या दिवसांत ही अपुरी व्यवस्था गंभीर धोका निर्माण करते.

गुन्हेगारी वाढीस खतपाणी
संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांतच गाड्यांवरून मंगळसूत्र हिसकावणे, एटीएम फोडणे, जबरी चोरी-दरोडे, शालेय मुलींची छेड काढणे, हाणामारी करणे, बुलेट मोटारसायकलमधून आवाज काढणे अशा घटना घडल्या आहेत. अशा वेळी सीसीटीव्ही फुटेज मिळाले असते तर गुन्हेगार ओळखणे व पकडणे सोपे झाले असते.

जबाबदारी कोणाची?
संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे ही यंत्रणा सांभाळण्याचे ठरवले होते; मात्र आजच्या घडीला कोणाकडेच यंत्रणा नीट चालवण्याची जबाबदारी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचा विश्‍वास ढासळत आहे. शहरात दररोज हजारो लोकांची वर्दळ असताना सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. अशा परिस्थितीत प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याने सुरक्षेचा ‘देखावा’ निर्माण करून प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नाही, असा नागरिकांचा सूर आहे.

लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे दोघेही संगमनेरचे नेतृत्व करत आहेत. या दोन्ही आमदारांनी सीसीटीव्ही प्रश्‍नावर गंभीर लक्ष घालून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. पोलिस प्रशासन, नगरपालिका यांना योग्य सूचना करून पुढील देखभालीसाठी लक्ष घालण्याचे सुध्दा सांगितले गेेले पाहिजे.

पुढे काय करावे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here