डॉ. प्रदीप कुटे यांची आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – वृद्ध महिलेच्या पोटावर आव्हानात्मक क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी करून, तब्बल 6 किलो वजनाचे गोळे काढण्यात यश आले. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर महिला ठणठणीत बरी झाली आहे अशी माहिती ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करणारे डॉ. प्रदिप कुटे यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील पळशी येथील 65 वर्षे वयाच्या आजीच्या पोटात गेल्या सहा वर्षांपासून वेदना होत होत्या. यामुळे आजी त्रस्त झाल्या होत्या. ओवेरियन सिस्टेडेनोमा या आजाराने त्या ग्रस्त झाल्या होत्या. या वृद्ध महिलेच्या पोटात वेदना होत असल्याने ती उपचारासाठी डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. डॉ. प्रदिप कुटे यांनी तपासणी केली असता तिच्या पोटात दोन गोळे असल्याचे निदर्शनास आले.

रुग्णाला बसण्यास, उभे राहण्यास व श्वास घेण्यासह खाण्यास त्रास होत होता. संपूर्ण तपासणी केल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत अनेक तासानंतर ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. भूल तज्ज्ञ डॉ. सोनाली कुटे यांनी भूल दिली. शस्त्रक्रिया डॉ. प्रदीप कुटेंसह सहकार्यांनी यशस्वी केली. शरद अडसुरे, महेश गांडोळे, संदीप कांनसे व अरफत पठाण यांनी त्यांना सहकार्य केले. वेदनेतून मुक्तता केल्याबद्दल वृद्ध महिलेसह नातेवाईकांनी डॉ. प्रदीप कुटे, डॉ. सोनाली कुटे व रुग्णालयीन कर्मचार्यांचे आभार मानले.
