बाजारभावानुसार भरपाईची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवआर्मी शेतकरी संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी काही वासरेही आणली होती. आंदोलन संपल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने ही वासरे आपल्या ताब्यात घेतली. या वासरांची रवानगी पांजरपोळ येथे करण्यात आली. यावेळी संगमनेरमध्ये भाकड जनावरे व वासरांची सरकारी खरेदी योजना राबवावी, या जनावरांचे योग्य संगोपन करण्यासाठी गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत, शेतकर्यांनी सरकारकडे दिलेल्या जनावरांच्या बदल्यात त्यांना बाजारभावानुसार भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काल येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला.

या आंदोलनामध्ये शिव आर्मी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही शेतकर्यांनी आपली वासरेही आणली होती. या आंदोलनामध्ये शिव आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे, अनिकेत घुले यांनी मनोगत व्यक्त केले. शासनाने भाकड जनावरे व वासरे यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. भाकड जनावरांच्या प्रश्नावर शासनाने शाश्वत तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याबाबत राज्य सरकारने एका महिन्यामध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी सर्व भाकड जनावरे व गोन्हे आणून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सोडतील असा इशारा यावेळी अनिकेत घुले यांनी दिला. जोपर्यंत भाकड जनावरांना बाजारभावाप्रमाणे पैसे दिले जात नाही. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दत्ता ढगे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी अजीज ओहोरा, शिवसेनेचे अमर कतारी, कैलास पानसरे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. मात्र, अधिकार्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्याने सर्व आंदोलनकर्ते प्रांताधिकारी यांच्या दालनासमोर जमा झाले. या ठिकाणी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत गीते गायली. मात्र, प्रांताधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.





















