संगमनेर तालुका पोलिसांची कठोर कारवाई

संगमनेर (प्रतिनिधी) –
बदनामी थांबवायची असेल तर पैसे भर! – अशी धमकी देत तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागणार्या युट्यूब चॅनेल चालकाविरोधात संगमनेर तालुका पोलिसांनी कठोर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ या युट्यूब चॅनेलचा चालक असलेल्या भाऊसाहेब साळवे (रा. टाकळी, ता. अकोले) या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
ही खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्त धाम सरकार – दत्त दिगंबर सेवाभावी संस्था’ या संस्थेच्या कार्यवाहक शिवम राजेंद्र गडगे (वय 21) यांच्या तक्रारीवरून उघडकीस आली.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

जुलै 2024 पासून साळवे हा शिवम गडगे यांच्यावर मानसिक दबाव टाकत होता. त्याने संस्थेच्या विरोधात बदनामीकारक व्हिडीओ युट्यूबवर टाकण्याची वारंवार धमकी दिली. व्हिडीओ टाकू नयेत म्हणून त्याने सुरुवातीला 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. बोलणी सुरू झाल्यानंतर रक्कम 6 लाखांवर आली, त्यातील 3 लाख तत्काळ, उर्वरित नंतर देण्याचा आग्रह साळवे करत होता. पण इतक्यावरच न थांबता साळवेने 5 ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा फोन करून 4 लाख रुपयांची नवी मागणी केली. त्यासाठी त्याने गडगे यांना धांदरफळ फाटा आणि अकोले बसस्थानका जवळील त्याच्या कार्यालयात बोलावले.

या सतत खंडणी मागणीला कंटाळून गडगे यांनी अखेर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 308(2) व 308(3) अन्वये गुन्हा क्रमांक 544/2025 दाखल करण्यात आला असून, आरोपी साळवे याला ताब्यात घेण्यात आले आहे. सेवाभावी संस्थेकडून निःस्वार्थपणे कार्य करणार्या तरुणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा हा प्रकार उजेडात आल्याने सामाजिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पत्रकारितेच्या आडून खंडणी मागणार्यांचा छडा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पत्रकारितेचा बुरखा पांघरत, सामाजिक संस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार म्हणजे नव्या स्वरूपातील गुन्हेगारी. यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, अशी एकमुखी भावना आता समाजात उमटत आहे.




















