RAS तंत्रज्ञानातून मत्स्यपालन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

0
564

उद्योग, शेती आणि विज्ञान यांचा संगम, ग्रामीण महाराष्ट्रासाठी नवा आदर्श

मत्स्यपालन हे पारंपरिक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन यांच्याइतकेच फायदेशीर ठरू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सौ. पुष्पलता दिघे यांचा प्रकल्प. जलसंवर्धन, पुनर्वापर, आणि नियंत्रित पर्यावरण यांचा उत्तम उपयोग करत त्यांनी संपूर्ण प्रकल्प शाश्‍वत बनवला आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला असून त्यांनी साकारलेला हा प्रकल्प महिला उद्योजकतेसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरला आहे.

संगमनेर – कोविड-19 च्या संकटकाळात अनेकांनी नव्या संधी शोधल्या. संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील सौ. पुष्पलता केशवराव दिघे यांनीही हाच मार्ग स्वीकारत पारंपरिक शेतीपलीकडे पाहिले आणि ’RAS’ तंत्रज्ञानावर आधारित मत्स्यपालन व्यवसाय सुरू करत ग्रामीण महिला उद्योजकतेचे एक प्रभावी उदाहरण निर्माण केले.
सौ. दिघे यांनी सुरुवातीला बायोफ्लॉक पद्धतीने एका गुंठ्यात 40,000 लिटर क्षमतेच्या टाकीत मत्स्यपालन सुरू केले. कोणताही पूर्वानुभव नसताना केवळ आत्मविश्‍वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पती केशवराव दिघे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी केला.
केशवराव दिघे हे सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवी असल्याने प्रकल्पाच्या स्थापनेतील तांत्रिक बाजूंवर त्यांनी काटेकोर लक्ष दिले. पुढे सौ. दिघे यांनी ’’Recirculating Aquaculture System (RAS)’ तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करून अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला ’RAS’ आधारित मत्स्यपालन प्रकल्प सुरू केला.

शासनाची कौतुकाची थाप

अहिल्यानगर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीमती प्रतिभा दत्तू मॅडम यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सांगिलतले की, RAS तंत्रज्ञानाचा अत्यंत शिस्तबद्ध वापर, व्यवस्थापनातील काटेकोरपणा, आणि सातत्याने प्रकल्पाची निगा राखणे ही सौ. दिघे यांची वैशिष्ट्यं आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकर्‍यांना मत्स्यपालनासारख्या आधुनिक व्यवसायाची नवी दिशा मिळाली आहे. ग्राहकांपर्यंत ताजे आणि दर्जेदार मासे पोहोचवण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रकल्पात वर्षभरात दोनदा मासे उत्पादन घेतले जाते. ग्राहकांना थेट जिवंत व ताजे मासे मिळत असल्याने बाजारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, मत्स्यपालनातून निर्माण होणार्‍या जैविक अवशेषांपासून सेंद्रिय मत्स्य खत तयार करून त्याचीही विक्री सुरू केली आहे.
सौ. दिघे यांच्या या उपक्रमामुळे जलस्रोत मर्यादित असलेल्या भागातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीपूरक व्यवसायाची नवी दिशा साकारली गेली आहे.
आज त्यांच्या प्रकल्पास भेट देण्यासाठी शेतकरी, अभ्यासक, आणि उद्योजक पुढे येत आहेत. सौ. पुष्पलता दिघे यांनी अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायक मॉडेल उभं केलं आहे. नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, तांत्रिक साक्षरता, आणि दृढनिश्‍चयाच्या आधारावर ग्रामीण भागात शाश्‍वत उत्पन्नाचा आदर्श उभारण्याचे त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशस्वी मत्स्यपालन करणार्‍या दिघे यांचे पुढील धोरणही सामान्यांना मदत करण्याचे आहे. प्रशिक्षण, प्रकल्पाविषयी सल्लामसलत, मत्स्यबीज तयार करणे आणि विकणे, मत्स्य खतातून शेतकर्‍यांच्या बागा फुलवणे, मत्स्य खाद्य उपलब्ध करणे अशी दिघे यांच्या इच्छा असून गरजूंनी 8830693942, 8668937514 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here