
INS विक्रांतच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानला ब्लॅकआऊटचा निर्णय
नवी दिल्ली |(दैनिक युवावार्ता) 9 मे 2025
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौसेनेनं महासागरातून पाकिस्तानवर निर्णायक कारवाई करत मोठा धक्का दिला आहे. भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या सामर्थ्यानं पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. कराची बंदरावर भारतानं जोरदार हल्ले चढवत 14 पेक्षा जास्त स्फोट घडवून आणले असून, या स्फोटांनी संपूर्ण कराची बंदर हादरून गेलं आहे. यामध्ये बंदराचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भारतीय नौसेनेच्या या धडक कारवाईनंतर पाकिस्ताननं घाबरून कराची बंदरात ब्लॅकआउट केलं. 1971 च्या युद्धानंतर प्रथमच कराची बंदरावर अशा प्रकारे भारतीय नौसेनेनं थेट हल्ले चढवले आहेत.

तीन लढाऊ विमानं जमिनीवर! भारताचं जोरदार प्रत्युत्तरदरम्यान, भारताच्या हवाई दलानं देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्ताननं आकाशातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला असतानाच, भारतीय वायूदलानं तीन लढाऊ विमानं पाडत पाकची नीट झोप उडवली आहे. चीनकडून मिळालेली दोन जेएफ-17 आणि अमेरिकेचं एफ-16 हे एकूण तीन विमानं भारतीय हवाई दलानं खाली पाडली आहेत. खुद्द पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी याची कबुली दिली असून, भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
एफ-16 सारख्या विमानांचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
‘आयएनएस विक्रांत’ ठरेल गेम चेंजर!- भारतीय नौसेनेचा ‘आयएनएस विक्रांत’ हा विमानवाहू युद्धनौका पाकिस्तानसाठी खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरू शकतो. या नौकेच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये असलेल्या एमआयजी-29के लढाऊ विमानांची हल्ला क्षमता 850 किलोमीटरपर्यंत आहे. या युद्धनौकेवर 64 ‘बराक’ आणि 16 ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रं सज्ज असून, ही क्षेपणास्त्रं हवेत आणि जमिनीवर अचूक लक्ष्य भेदण्यास सक्षम आहेत.उपग्रह प्रतिमांनुसार, पाकिस्तानकडे केवळ दोन जुन्या पाणबुड्या असून, त्या देखील दुरुस्तीत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे युद्धाच्या स्थितीत आयएनएस विक्रांत पाकिस्तानसमोर ठामपणे उभा राहून निर्णायक विजय मिळवू शकतो.
नवी दिल्ली |(दैनिक युवावार्ता) 8 मे 2025: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मेच्या दरम्यान भारतीय हद्दीत असलेल्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील लष्करी तळांना लक्ष्य करताना पाकिस्तानने 15 पेक्षा जास्त ठिकाणी आक्रमणाची तयारी केली होती. मात्र भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे आणि अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीममुळे हे हल्ले निष्फळ ठरले.
भारतीय वायुदलाने तत्काळ प्रत्युत्तर देत लाहोरजवळील पाकिस्तानच्या HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीवर अचूक ड्रोन हल्ला केला आणि ती प्रणाली पूर्णतः निष्क्रिय केली. भारतीय लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.

पाकिस्तानचे हल्ले आणि भारताचे उत्तर
भारतीय लष्करी सूत्रांनुसार, पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, जालंधर, लुधियाना, भुज, फलोदी, चंदीगड अशा अनेक लष्करी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे एकाच वेळी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या ‘इंटिग्रेटेड काउंटर-यूएएस ग्रिड’ प्रणालीमुळे हे सर्व हल्ले रोखण्यात आले.
दरम्यान, सीमावर्ती भागांमध्ये—कुपवाडा, उरी, पुंछ, राजौरी, मेंढर इ.—पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा करत नागरिकांवर थेट हल्ले चढवले. या हल्ल्यांमध्ये १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात लहान मुले आणि महिला यांचा समावेश आहे.
भारताने या बिनप्रवोक आक्रमणांना फोकस्ड, मोजकं आणि तणाव न वाढवणारं प्रत्युत्तर दिलं असून, पाकिस्तानच्या लष्करी स्थळांऐवजी फक्त हवाई संरक्षण टप्प्यांवर अचूक लक्ष्य साधलं असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.
HQ-9 प्रणाली म्हणजे काय?
HQ-9 ही चीनच्या CPMIEC या सरकारी संस्थेद्वारे विकसित केलेली पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी (Surface-to-Air Missile – SAM) प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये एकाचवेळी 100 हवाई लक्ष्य ओळखून त्यांच्यावर मारा करण्याची क्षमता आहे. तिची रेंज सुमारे 125 ते 200 किमी दरम्यान आहे.
पाकिस्तानने 2021 मध्ये ही प्रणाली आपल्या संरक्षणात समाविष्ट केली होती. ती चीनच्या FT-2000 आणि रशियन S-300 प्रणालीवर आधारित असून, पाकिस्तानी लष्करासाठी ती एक महत्त्वाची हत्यार मानली जात होती.
पण भारतीय राफेल, सुखोई-30 MKI आणि ब्राह्मोस यांसारख्या हवाई आणि क्षेपणास्त्र शक्तीसमोर HQ-9 ही प्रणाली अप्रभावी ठरली आहे. भारतीय लष्कराने यावेळी ड्रोनद्वारे अचूक हल्ला करत ती प्रणाली निष्क्रिय केली.
S-400 विरुद्ध HQ-9: तांत्रिक फरक
HQ-9 ची तुलनाच भारताच्या रशियन बनावटीच्या S-400 प्रणालीशी होऊ शकत नाही. S-400 ची रेंज 400 किमी पर्यंत असून, ती केवळ काही मिनिटांत सक्रिय होते. त्याउलट HQ-9 ला पूर्णपणे तैनात करण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो. S-400 सिस्टिम अनेक प्रकारच्या लक्ष्यांवर एकाचवेळी मारा करू शकते आणि ती भारतीय हवाई सामर्थ्याचा अत्यंत प्रभावी भाग बनली आहे.
भारताची भूमिका स्पष्ट
भारतीय लष्कराने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, भारत कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको म्हणूनच संयम राखतोय. मात्र भारताच्या सार्वभौमत्वावर किंवा नागरिकांवर झालेल्या हल्ल्याला योग्य आणि ठोस प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे.