तालुक्यात दिसल्यास लाडक्या बहिणी देणार चोप; राज्यातून निषेध
१२ तासानंतर 5 गुन्हे दाखल; पोलिसांच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह
संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील धांदरफळ बु॥ येथे भाजपची युवा संकल्प सभा डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली आणि त्यांनी बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसह तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. देशमुख यांचे बेताल वक्तव्य तालुकाभर पसरल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत धांदरफळ येथुन येणार्या भाजप कार्यकर्त्यांच्या अनेक गाड्या फोडल्या तर चिखली येथे एका कारची जाळपोळ देखील करण्यात आली. तसेच काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील करण्यात आल्याची घटना अकोले नाका परिसरातील पुलाखाली, खांडगाव दुध डेअरी समोर, चिखली येथे घडली. या सर्व घटना शुक्रवार रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडल्या. यानंतर तालुका पोलीस ठाणे येथे ठिय्या आंदोलन करून देशमुखला अटक करा, अटक करा, सुजय विखेंला अटक करा अशी घोषणाबाजी करून घटनास्थळी व त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर पोलिसांनी पहाटेपर्यंत विविध प्रकारचे पाच गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर सकाळी सहा वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले.
धांदरफळ येथील मा.खा. सुजय विखेंच्या सभेत डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या वसंतराव देशमुख यांच्यावर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर थोरात समर्थक महिला जाब विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना धक्काबुक्की केल्याचा पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला. घटनेनंतर तालुक्यातील निमोण गावात युवक आणि महिलांना मारहाण प्रकरणी विखे समर्थक सरपंच तसेच काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. निमोण गावात मारहाण झालेल्या मुलाला आणण्यासाठी गेलेल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री घडलेल्या घटनेनंतर काँग्रेससह महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी तालुका पोलिस ठाण्यासमोर सकाळी 10.00 वा. आरोपींच्या अटकेसाठी पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी डॉ. जयश्री थोरात यांच्यासह खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. निलेश लंके, प्रभावती घोगरे, मा.आ.डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, मैथिली तांबे, माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, विश्वास मुर्तडक, सुरेश थोरात, शंकर खेमनर, अमर कतारी, उत्कर्षा रूपवते, निर्मला गुंजाळ, निखील पापडेजा, सोेमेश्वर दिवटे, गौरव डोंगरे आदींसह तालुका व जिल्ह्यातून अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी अजून एक अर्ज दाखल केलेला नसताना संगमनेरमध्ये राजकारणात नुसते पेटले नाही तर अत्यंत खालच्या पातळीवर टिका टिपण्णी सुरू झाली आहे. आता तर भाषणात गलिच्छ आणि महिलांचा अवमान करणारे वक्तव्य जाहीरपणे केले जात आहे. जाहीर सभेमध्ये कोणत्याही प्रकारच्या विकास कामांबाबत अथवा जनतेच्या हिताबद्दल वक्तव्य न करता, केवळ आणि केवळ टीका टिप्पणी करण्याच्या नादात, आई बहिणींची अब्रू वेशीवर टांगणार्या वक्तव्याचा तालुक्यासह संपूर्ण राज्यातून निषेध होत आहे. संगमनेर तालुका हा पुरोगामी विचारांचा व सुसंस्कृत सभ्यतेचा म्हणून ओळखला जातो. सर्व महान परंपरेचा आदर, सन्मान या तालुक्यामध्ये केला जातो किंवा ती संगमनेर तालुक्याची तशी ओळख आहे.
यापूर्वी निवडणुकांमध्ये संगमनेर तालुक्यात वैचारिक मंथन होताना दिसत असायचे. परंतू आता विचारांची आणि प्रचाराची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. असाच प्रकार कालच्या धांदरफळ घटनेत दिसून आला. यावेळी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, वसंतराव देशमुख यांनी केलेलं वक्तव्य हे कोणत्याही नेत्याला न शोभणारं आहे. तुम्ही (भाजपा) महिलांना राजकारणात 50 टक्के आरक्षण देण्याच्या गप्पा मारता, परंतु, तुमच्याच पक्षात अशा प्रकारची वक्तव्ये करणारे लोक असतील तर महिलांनी राजकारणात का यावं? मी काय वाईट करत होते? मी केवळ माझ्या वडिलांसाठी राजकारणाच्या मैदानात उतरले होते. युवा संवाद यात्रेद्वारे लोकांना भेटत होते. मी असं काय केलं होतं की माझ्याबद्दल इतकं वाईट बोललं गेलं?
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, वसंतराव देशमुख जे काही बोलले ते बोलणार्यांच्या वयाला शोभणारं आहे का? ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच अशा गलिच्छ भाषेत, खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. विरोधकाला देखील एक पातळी असते, मात्र ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या मुलींबद्दल घाणेरडं बोलत होते. हे त्यांना शोभणारं नाही. माझ्या आजोबांनी यापूर्वी त्यांना एकदा खडसावलं होतं, त्यांना सरळ केलं होतं. परंतु, ते आजही तसेच आहेत. अशा माणसाला लोक आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान का देतात हाच प्रश्न आहे.
वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे सुजय विखे यांच्या उपस्थितीत केले आहे. बाळासाहेब थोरात हे राज्याचे नेतृत्व करत असताना जयश्री थोरात या संगमनेर तालुक्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत हे काही लोकांना हे सहन होत नाही. त्यातून अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर आरोप केले जात आहे. याप्रसंगी महिला नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विखे-देशमुख यांच्यावर जोरदार टिका करत या घटनेचा निषेध केला तसेच महिलांचा अपमान करणारे वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याबाहेर मोठे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राहता काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे, श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, सचिन गुजर, करण ससाने, दिपाली ससाने, राहुरीचे बाळासाहेब आढाव, इंद्रजीत थोरात, माजी नगरसेवक गोरख कुटे व सोमेश्वर दिवटे, आरपीआय बाळासाहेब गायकवाड, ठाकरे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्यासह संगमनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते.दोघांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यापुढे असे वक्तव्य केल्यास याच लाडक्या बहिणी रस्त्यात चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महिलांनी दिला. दरम्यान घटना घडून अनेक तास उलटले तरी पोलिस दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी केला.
देशमुखांवर कारवाई करा, भाजपाने झटकले हात
महायुतीच्या मेळाव्यामध्ये वसंतराव देशमुख यांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय आक्षेपार्ह भाषेत टीका केली, त्यांचे भाषण सुरू असताना मी त्यांना दोनदा थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते थांबले नाहीत. मी तिथे असताना मला ते समजलं नाही, नंतर एकाने मला सांगितलं ते काय बोलले, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याआधी हा सर्व गोंधळ उडाला. महायुतीच्या कोणत्याही पदाधिकार्याचे त्या वक्तव्याशी संबध नाही, त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, जर अशा खालच्या पातळीवर किंवा पातळी सोडून वक्तव्ये करत असेल तर त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पक्षात ठेवलं जाणार नाही. त्याला महायुतीमध्ये ठेवलं जाणार नाही, असंही यावेळी सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे.वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. योग्य ती कारवाई त्यांच्यावर करावी, या वक्तव्यावर कलम लावून पोलिस प्रशासनाने यावर कारवाई करावी, त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आणि जाळल्या त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असंही विखे पाटलांंनी म्हटलं आहे.दरम्यान या प्रकरणाचा संगमनेर भाजपाने देखील जोरदार निषेध केला आहे. जाहीर मंचावरून कोणाबद्दल विशेषत: स्त्रीयांबद्दल कोणीही आदर ठेवूनच बोलले पाहिजे मात्र वसंत देशमुख यांनी मर्यादा सोडली. देशमुख हे भाजपाचे कार्यकर्ते किंवा सभासद नाही. परंतू भाजपाच्या व्यासपीठावरून बोलले आहेत. त्यामुळे संगमनेर भाजपाच्या वतीनेही अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.