शिर्डीत विखे विरूद्ध घोगरे तर संगमनेर थोरात विरूद्ध विखे

निवडणूकीचा फड जमलाय औंदा, बापाच्या विजयासाठी पोरांनीच लावलाय खांदा


वर्चस्वाची निवडणुक लढाई

विखे – थोरात हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारातील दिग्गज नेते. काँग्रेस पक्षात दोघेही असताना दोघांनी सावतासूभा राखत आपापले गड राखत जिल्ह्यात आणि राज्यात वर्चस्व निर्माण केले. आता मात्र पक्ष वेगळे असल्याने हा संघर्ष टोकाला गेला आहे. महसूलमंत्री म्हणून विखे यांनी थोरातांच्या कार्यकर्त्यांना बेजार केले तर डॉ.सुजय विखे यांचा पराभव घडवून आणण्यात थोरातांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ कुठलाही असो संघर्ष हा या दोन्ही नेत्यांमध्ये होतांना दिसत आहे. पराभवाचा बदला घेण्यासाठी विखे हट्टाला पेटले आहे. तर सत्तेच्या माध्यमातून त्रास देणार्‍या विखेंना पुन्हा एकदा धडा शिकविण्यासाठी थोरातांनी व्युव्ह रचना आखली आहे.


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी सायंकाळी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. राज्यातील 48 उमेदवारांमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब थोरात व शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे शिर्डीत आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती घोगरे यांच्यात थेट लढत होणार आहे. संगमनेर विधानसभेसाठी विरोधकांना अद्यापपर्यंत उमेदवार मिळालेला नाही. परंतु डॉ. सुजय विखे यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही तर प्रसंगी शिवसेना शिंदे गटाकडून लढण्याची तयारी असल्याने संगमनेरमध्ये थोरात विरूद्ध विखे असा ऐतिहासिक सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसकडून अपेक्षेप्रमाणे संगमनेरमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून थोरात यांची एकहाती सत्ता आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय विरोध गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याचाच परिणाम म्हणून थोरात यांच्या विरोधात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे उमेदवारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्यपातळीवर गाजणार आहे. शिर्डी मतदारसंघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात विखे यांचे कायम वर्चस्व आहे. घोगरे यांना थोरात यांनी निवडणुकीसाठी मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे ही लढत विखे व घोगरे यांच्या रुपाने होत असली तरी खर्‍या अर्थाने विखे -थोरात यांच्यातच रंगणार आहे. हे दोन्हीही मतदारसंघ शेजारी-शेजारी आहेत. त्यामुळे या निवडणुकीत थोरात-विखे वाद अधिक टोकाचा होईल, अशीच शक्यता आहे.


बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस पक्षामध्ये तसेच महायुतीमध्ये मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे दिल्ली, मुंबई आणि राज्यभरात दौरे सुरू आहे. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा विजय रथ डॉ. जयश्री थोरात मोठ्या जोमाने पुढे नेत आहे. युवासंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्याला मतदारांचाही चांगला पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपचे स्टार प्रचारक असल्याने राज्यभर त्यांच्या सभा होणार आहे. तर त्यांच्या गैरहजेरीत डॉ. सुजय विखे हे दोन्ही मतदार संघ पिंजून काढत असून वडिलांच्या विजयासाठी आणि वर्चस्वासाठी मोठा लढा देत आहे. मुख्य उमेदवार ज्येष्ठ नेते थोरात-विखे असले तरी आता मतदार संघात खरी चर्चा होत आहे ती त्यांच्या मुलांची.
शिर्डी मतदार संघातून दोन्ही पक्षाची उमेदवारी जाहीर झाली असली तरी संगमनेर मतदार संघात अद्याप घोषणा नाही. मात्र तरीही संगमनेरची निवडणूक बिन उमेदवाराची गाजत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख