Friday, October 18, 2024

प्रशासनाचा गलथानपणा संगमनेरच्या विकासाला मारक

शहराचे वैभव असणारे बसस्थानक समस्याच्या विळख्यात

संगमनेर (प्रतिनिधी) – एखादी योजना किंवा कायदा कितीही चांगला असू द्या, जो पर्यंत प्रशासन त्या योजनेची किंवा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत ती योजना, कायदा प्रभावी ठरत नाही. अशीच काहीशी अवस्था येथील बसस्थानक प्रशासन, नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाची दिसून येते. संगमनेर शहराचे वैभव असणार्‍या बसस्थानक आवारात अस्वच्छता, भिकार्‍यांचे बेकायदेशीर वास्तव्य, मोकाट जनावरांचा वावर, चोर लुटारुंची लुटमार, बेशिस्त पार्कींग आणि आता बसस्थानकासमोरच पडलेले मोठमोठे खड्डे नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्थानिक नागरीकांना याची सवय असली तरी परगावाहून आलेल्या पाहुण्यांना दिसणारे हे चित्र व त्यातून शहराची होणारी बदनामी संगमनेरकरांसाठी निश्‍चित संतापजनक आहे.

महाराष्ट्रातील मोजक्या भव्य दिव्य आणि सुसज्ज बसस्थानकापैकी एक असणारे आणि बिओटी तत्वावर विकसित झालेले संगमनेर बसस्थानक अल्पावधीतच विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. याबाबत अनेक वेळा येथील प्रशासनाला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला गेला परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नाही. आजमितीला या बसस्थानकात परप्रांतीय, बेवारस लोकांच्या टोळ्याच मुक्कामाला आहेत. कोण कुणाची बायको, कोण कुणाचा नवरा आणि कुणाचे किती आणि कोणते मुले याचा कुठलाही थांगपत्ता कुणाला नाही. बसस्थानकाच्या भव्य आवारात पाहिजे तेथे पथारी मांडून हे लोक बसत असतात. ज्यांच्यासाठी हे बसस्थानक बांधण्यात आले आहे त्या प्रवाशांनाच तेथे बसण्याची सोय उरली नाही.

बसस्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर येतानाही या बेवारस टोळ्यांना ओलांडून यावे लागते. येथील व्यापार्‍यांना या बेवारस टोळ्यांचा प्रचंड त्रास होत असतानाही यावर कोणी आवाज उठवत नाही. प्रवाशीही क्षणिक संताप करतात. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे नाकाला रूमाल बांधून ये-जा करतात. मात्र शांत राहतात. त्यामुळे येथील प्रशासनाचे फावले असून कोणीही याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. सध्या पडत असलेल्या पावसामुळे बसस्थानक आवारात तसेच समोरील महामार्गावर मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यात आदळूनच एस.टी. बसला आत-बाहेर जावे लागते. मात्र तो बुजविण्याचे साधे सौज्यनही आगार प्रशासन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग दाखवत नाही.

बसस्थानकाच्या आवारात बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांची प्रचंड गर्दी वाढली आहे. अनेकांनी रोडवर पुन्हा एकदा बेकायदेशीर टपर्‍या, हातगाड्या टाकून रस्ता अडवला आहे. आतमध्ये तर बेकायदेशीरपणे मोठे वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे. त्यासोबतच मोकाट जनावरांच्या वावरामुळे व त्यांच्या शेणामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. शहरातील असंख्य नागरिक नित्यनेमाने या परिसरात कामासाठी किंवा फिरण्यासाठी येत असतात आणि हा सर्व अशोभनीय विकास पाहून केवळ संताप व्यक्त करत असतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख