सोनोशी येथील ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा
युवावार्ता (प्रतिनिधी)
तळेगाव दिघे – संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील भूमिपुत्र आणि राज्याच्या मृद व जलसंधारण खात्याच्या नाशिक विभागातील प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांच्यावर राज्याच्या जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता तथा पदसिध्द सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सोनोशी येथील ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यासंदर्भातील शासन आदेश सोमवारी (दि. 12 ऑगस्ट) जारी करण्यात आला आहे. नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वीच हरिभाऊ गिते यांना बढती मिळाली होती. त्यांनी राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार दोनचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळवण्याच्या कामात महत्वपूर्ण सहभाग घेतला होता.
तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानालाही त्यांनी गती दिली होती. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी जलयुक्त शिवार ही योजना प्रभाविपणे राबविण्याचा मानस यानिमित्ताने हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केला.
राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या पदसिध्द सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने हरिभाऊ गिते यांचे मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे