झोळे गावात पहाटे रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
आरोपीच्या शोधासाठी पोलीसांचा कसून तपास सुरू
संगमनेर युवावार्ता प्रतिनिधी
घराच्या पडवीत झोपलेल्या सत्तर वर्षे वयाच्या वृद्धाचा डोक्यात अज्ञात व्यक्तींने धारदार शस्त्राने घाव घालत खून केला. हा प्रकार आज सोमवारी सकाळी तालुक्यातील झोळे गावात उघडकीस आला. साहेबराव भिमाजी उनवणे असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
संगमनेर तालुक्यातील झोळे गावात ही घटना घडली असून या वृद्धाचा खून कोणी आणि कशासाठी केला याची उकल करण्याचे मोठे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
मयत साहेबराव उनवणे हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून घराबाहेर असलेल्या पडवीमध्ये झोपले होते. अज्ञात व्यक्तीने केलेल्या खुनाचा हा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला.
सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या सुनेने त्यांना उठविण्यासाठी पडवीत जाऊन आवाज दिला असता सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. उनवणे यांचा मुलगा दीपक याने घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना कळविली.
त्यानंतर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान घटनास्थळी श्वानपथक बोलाविण्यात आले असून त्याबरोबरच फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा संपूर्णतः तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी म्हटले आहे.
[दरम्यान या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दीपक साहेबराव उनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.न. ४५०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) नुसार अज्ञात आरोपी विरोधात जुना दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.