आनंदगड समाज परिवर्तनाचे मंदिर – मा. आ. डॉ . तांबे

0
885

आनंदगडचा रौप्यमहोत्सवी कृतज्ञता सोहळा उत्साहात
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले-
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा दर्जा टिकवून आपले जीवन फक्त आणि फक्त शिक्षणासाठी समर्पित केले. त्यामुळे आनंदगड शिक्षण संकुल हे समाज परिवर्तनाचे मंदिर झाले आहे. रावसाहेब वाकचौरे व अनिल रहाणे यांनी स्वतः जवळ शून्यातून हे शैक्षणिक संकुल उभे केलेले आहे. ते जागतिक दर्जाचे शिक्षण संकुल होणार यात कोणतीही शंका नाही असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.


ते विरगाव येथील आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्य महोत्सव व कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. यावेळी योगी केशव बाबा चौधरी, माजी आमदार वैभवराव पिचड, मधुकरराव नवले, रंगनाथ पा. वाकचौरे, शिवाजीराजे धुमाळ, सुरेशराव कोते, डॉ.जालिंदर भोर, राजेंद्र देसाई, सह. आयुक्त संतोष ठुबे, सुनील दातीर, सुधाकरराव देशमुख, सीताराम भांगरे, दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, डॉ. निलीमा निघूते, सौ. सोनाली नाईकवाडी, राजेंद्र देशमुख, रवींद्र देशमुख, बाळासाहेब नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, रवींद्र वामन, अरीफभाई तांबोळी, आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, विनय दराडे, सचिन दराडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी झरेकर, शंकरराव कदम, राहुल कदम, पराग पगार, विजय पोखरकर, विद्याचंद्र सातपुते, अमोल वैद्य, सुनिल शिंदे, अरुण कराड, अरुण शेळके आदींसह संस्थेच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान देणारे सर्व मान्यवर, विविध संस्थाचे पदाधिकारी, प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विशेष सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी वैभवराव पिचड म्हणाले की, संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होणे हा आनंददायी क्षण आहे. रावसाहेब वाकचौरे व अनिल रहाणे, त्यांची टीम हे सर्व ध्येय वेडे असून रावसाहेब वाकचौरे यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न अनिल रहाणे यांनी पूर्ण केले आहे. ध्येयाने पछाडलेली ही जोडी आहे. आदिवासी, गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून ते उच्च पदस्थ, उद्योजक झाले. खर्‍या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू केलेले शैक्षणिक संकुल सुरू करण्याचा हेतू सफल झाला आहे. संस्था इंटरनॅशनल स्तरावर जावो ही सदिच्छा व्यक्त केली. वेडी माणसे इतिहास रचतात याचे उदाहरण म्हणजे रावसाहेब वाकचौरे व अनिल रहाणे असून ते हरवलेल्या वाटामधील कोलंबियस आहेत. या संस्थेने बौद्धिक सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये तयार केले आहे. मधुकरराव पिचड यांचे यासाठी मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मधुकर नवले यांनी केले. डॉ. जालिंदर भोर यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरु असलेल्या या संकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी भेट दिलेली असून त्यांच्या सहकार्याने मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्‍न मार्गी लावून लवकरच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होईल असे ते म्हणाले.


शिवाजी राजे धुमाळ यांनी या संस्थेचा खडतर प्रवास उलगडून दाखविला. धर्मवीर आनंद दिघे यांचे नावाला साजेसे असे काम केले आहे. त्यामुळे या संस्थेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करावी म्हणून आपण भेटणार आहोत असे सांगितले. सहआयुक्त संतोष ठुबे यांनी शहरी भागापेक्षाही दर्जेदार शिक्षण देवून ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्याना सर्वगुण संपन्न घडविण्याचे काम संस्था करत असल्याचा अभिमान बोलून दाखविला. यावेळी माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक विनय दराडे म्हणाले की, ही संस्था व संस्थाचालक हे आमचे पालक होते, आमच्या जीवनाला त्यांच्या संघर्षाने आकार दिला आहे. यावेळी ठाणे विभागप्रमुख राजेंद्र देसाई, माजी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र देशमुख, दत्तात्रय वाणी, अरीफभाई तांबोळी आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक करताना अनिल रहाणे यांनी ही संस्था उभारणी करण्यात ज्यांनी ज्यांनी हात भार लावला अशा जवळपास 300 व्यक्तींचा नामोल्लेख करीत त्यांचा व सर्व माजी शिक्षक, विद्यार्थी अशा 600 जणांचा सन्मान केला.


अशा प्रकारची कृतज्ञता व्यक्त करणारे आनंदगड शिक्षण संकुल पहिलेचं संकूल ठरले आहे. स्वागत प्रतिक्षा रहाणे, शिवराज वाकचौरे, प्राचार्य किरण चौधरी, पल्लवी फलके यांनी, सूत्रसंचालन संदिप थोरात यांनी केले तर आभार सौ. गव्हाळे मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here