अन्न औषध प्रशासनाची परवानगी व सर्व शासकीय चाचण्यांचे अहवाल उपलब्ध
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- शहरातील प्रसिद्ध व्यापारी तसेच संगमनेर व्यापारी असोसिएशनचे सदस्य असलेल्या तीन तेलाच्या व्यापार्यांविरुद्ध मागील दोन ते तीन महिन्यांपासून काही जणांकडून भेसळीबाबत अप्रचार सुरू आहे. या व्यापार्यांची बदनामी हेतूपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप करून या व्यापार्यांविरुद्ध आत्तापर्यंत कोणतीही तक्रार नसल्याचा दावा करत खाद्यतेलाच्या अपप्रचारावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील तीन व्यापार्यांच्या विरोधात भेसळीचे आरोप करून काही जणांनी त्याचे भांडवल केले आहे. जाणीवपूर्वक काही त्रुटी शोधून संबंधीत प्रशासनाकडे तक्रार केली मात्र या तक्रारीनंतर देखील अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्याकडून खाद्यतेलांचे नमुने घेऊन प्रशासनाने त्याची तपासणी केली असता संबंधित खाद्यतेल हे प्रमाणित आहे असे सिद्ध झाले आहे असे प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित व्यापार्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे तक्रारदारांचा आरोप हा चुकीचा असल्याचे व्यापार्यांचे म्हणने आहे. दरम्यान हे तीनही व्यापारी अनेक वर्षांपासून खाद्यतेल व्यवसायात आहेत. मागील अनेक वर्षांपासून या व्यापार्यांवर एकही भेसळीची केस नाही किंवा गुन्हा नोंद नाही.
संगमनेर शहर ही मोठी बाजारपेठ आहे. अनेक चांगले व्यावसाय व व्यावसायीक या शहरात अनेक वर्षांपासून व्यावसाय करत आहे. मात्र जाणीवपुर्वक केलेल्या तक्रारीनंतर व समाजात, ग्राहकांमध्ये चुकीचा संदेश गेल्यामुळे सदरच्या तीनही व्यापार्यांच्या प्रतिष्ठेला व सचोटीला जो धक्का लावण्याचा व बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या व्यावसायावर मोठा आर्थिक परिणाम होत आहे. तसेच कुटूंबाची व व्यावसायाची बदनामी होत आहे. केवळ या तीनही व्यापार्यांची बदनामी नसून समस्त व्यापारी वर्गाची बदनामी आहे तसेच संगमनेर शहराच्या बाजारपेठेला व व्यावसायाला यामुळे डाग लागत आहे. आज पर्यंत या आरोपात कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही. सर्व प्रमाणपत्र योग्य असतांनाही या आरोपांमुळे संपूर्ण व्यापारी वर्गाच्या प्रतिष्ठेला व सचोटीला पण हेतूपूर्वक धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेल हा आपल्या आहारातील मुख्य घटक आहे. त्यात काही कमी जास्त झाल्यास त्याचा नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याची जाणीव येथील व्यापार्यांना आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असे आवाहन किराणा व धान्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी, सचिव शरद विठ्ठल गांडोळे यांच्यासह संगमनेर व्यापारी असोसिएशने केले आहे.
आश्वासनानंतर उपोषण मागे
मागील अनेक दिवसापासून संगमनेर मधील भेसळ करणार्या तेल कंपनी विरोधात अनेक निवेदन तक्रार अर्ज देवून देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधित तेल कंपन्यावर करवाई च्या मागणीसाठी सुनील घुले हे उपोषणास बसले होते. दरम्यान काल मंगळवारी या उपोषणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनानाचे वरीष्ठ अधिकारी यांनी घुले यांची भेट घेऊन आपल्या तक्रारीची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर घुले यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच या उपोषणाला पाठिंबा देणारे शिवसेना (उबाठा) चे माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, शिवसेना शहर संघटक पप्पू कानकाटे, भाऊसाहेब हासे, दिपक साळुंखे, सचिन साळवे, रवि गिरी, राजू खरात, राजू सातपुते, अजिज मोमीन यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.