शंभर फुटी तिरंगा, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि संविधान भवनाचा संकल्प

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – देशातील प्रत्येकाला समतेचा हक्क देणारी राज्यघटना ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली. या संविधानावर भारत देश शतकाकडे वाटचाल करत असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभे करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, प्रा.बाबा खरात, प्रा.हिरालाल पगडाल, बाळासाहेब गायकवाड,राजू खरात, ड सुहास आहेर, तात्याराम कुटे, प्रवीण गायकवाड, प्रकाश पारखे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. सत्यजित तांबे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही देशासाठी मोठी देण आहे. सर्वांना समतेचा अधिकार या राज्यघटनेमुळे मिळाले आहे. राज्यघटनेमुळे देशाची वैभवशाली वाटचाल सुरू असून देश शतकाकडे वाटचाल करत आहे. या महापुरुषांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. संगमनेर मध्ये लवकरच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार असून याच ठिकाणी संविधान स्मारक उभारले जाणार आहे. याच बरोबर शंभर फुटी तिरंगा झेंडा व संगमनेर बस स्थानकासमोर हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले असून समतेचा विचार पुढं नेणारी राज्यघटना व तिचे विचार जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, कायदे तज्ञ, विचारवंत, इतिहासाचे अभ्यासक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी सातत्याने अभ्यास करत ज्ञानातून जगापुढे आदर्श निर्माण केला. रायगडच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. सर्वांना समतेचा विचार दिला. प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्या. भारताला लोकशाही व संविधान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताच्या व जगाच्या इतिहासात मोठे स्थान असल्याचे मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.


















