कार्यसम्राट आ. डॉ. किरण लहामटे यांचा दमदार विजय

0
4047

अकोले (प्रतिनिधी) – राज्याच्या सत्तासंघर्षात हिंमत दाखवून अजित पवार यांच्यासोबत जाऊन शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत मोठा निधी अकोले मतदार संघात आणला. या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावली. तरूणांना रोजगारासाठी मिनी एमआयडीसीची मंजूरी आणली. पर्यटन विकासासाठी चालना दिली. सातत्याने जनसंपर्क ठेवत जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न मार्गी लावले. त्यामुळे अकोले विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सलग दुसर्‍यांदा कार्यसम्राट आमदार म्हणून महायुतीचे डॉ. किरण लहामटे यांना विजयी करत विधानसभेत पाठविले. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासमोर मा. आ. वैभव पिचड आणि मविआचे उमेदवार अमित भांगरे यांचे कडवे आव्हान होते. मात्र या आव्हानाला तोंड देत लहामटे यांनी 5556 मतांनी दणदणीत विजय संपादित केला.

216 अकोले विधानसभा मतदारसंघ हा आदीवासी बहुल मतदार संघ आहे. या मतदार संघावर 40 वर्षे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मा. आ. वैभव पिचड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत पिचडांचा पराभव केला. त्यानंतर सलग 5 वर्षे त्यांनी मतदारसंघातील जनतेशी संवाद कायम ठेवत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. परंतू 2022 ला पुन्हा राज्यात राजकीय घडामोडी घडल्या. परंतू आ.डॉ. लहामटे स्थिर राहिले. सर्वत्र खोके, गद्दार अशा टीका होत असताना लहामटे यांनी त्याला आपल्या कामातून उत्तर दिले. 2024 विधानसभा निवडणुकीत डॉ. लहामटे यांना महायुतीची उमेदवारी जाहिर झाली. महायुतीचेच असणारे वैभव पिचड यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली. तर महाविकास आघाडीकडून अमित भांगरे यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक लढवली. या निवडणुकीचा शनिवार 23 रोजी मतमोजणीला सुरूवात होताच अमित भांगरे यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. काही फेर्‍या अमित भांगरे हे आघाडीवर होते. मात्र त्यानंतर लीड तोडून डॉ. किरण लहामटे यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. कमी फरकाने का होईना डॉ. लहामटे यांनी आपली आघाडी कायम ठेवली.

या निवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांना 73958, अमित भांगरे यांना 68402 तर वैभव पिचड यांना 32532 असे मतदान झाले. इतर अपक्षांना किरकोळ मते मिळाली तर नोटाला 2517 मते मिळाली. 5556 मतांनी डॉ. किरण लहामटे यांचा सलग दुसर्‍यांदा विजय झाला. निवडणुकी दरम्यान अनेक घडामोडी या ठिकाणी घडल्या. डॉ. किरण लहामटे यांना ज्येष्ठ नेते सिताराम पा. गायकर, विनय सावंत यांच्यासारख्या नेत्यांचे मोठे पाठबळ लाभले. त्यांच्या विजयासाठी पत्नी पुष्पाताई लहामटे व परिवाराने देखील प्रचंड मेहनत घेतली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंढे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अकोले येथे सभा घेतल्या. कार्यकर्त्यांचा विश्‍वास, मेहनत आणि लहामटे यांचे काम यामुळे अकोले विधानसभा मतदार संघातून डॉ. किरण लहामटे यांचा विजय सुकर झाला आहे. या विजयाबद्दल डॉ. लहामटे यांचे मतदार संघातून अभिनंदन होत असून महायुतीच्या मंत्रीमंडळात आ. डॉ. किरण लहामटे यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असा विश्‍वास कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here