साप्ताहिक वृत्तपत्रांना सहकार्य करू – माहिती संचालक डॉ. तिडके यांची ग्वाही

0
1141

लघु संवर्गातील वृत्तपत्रांच्या प्रश्नांचा शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी विविध संघटना प्रतिनिधींची घेणार दरमहा बैठक

युवावार्ता (प्रतिनिधी)
मुंबई – महाराष्ट्रातील लघु संवर्गातील वृत्तपत्रांचे तसेच संपादकांचे प्रश्न शासकीय स्तरावरून सोडविण्यासाठी लघु संवर्ग वृत्तपत्र संघटना प्रतिनिधींनी मंत्रालयात जाऊन माहिती संचालक डॉ. राहुल तिडके यांची सोमवार दि. 29/04/2024 रोजी भेट घेतली. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भेटीत स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स असोसिएशन, महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद, महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ या संस्थांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.
किसन भाऊ हासे यांनी लघु संवर्ग वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती वाढीव साईजने मिळाव्यात, अधिस्वीकृती पत्रिका व आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत होणारा अन्याय दूर करावा, जाहिरात दरात 100% वाढ करावी, शासनाच्या विशेष प्रसिद्धी अभियानच्या जाहिराती लघु संवर्गातील वृत्तपत्रांना मिळाव्यात यासंबंधी माहिती संचालक डॉ. राहुल तिडके यांचे समवेत तपशीलवार चर्चा केली. या चर्चेत जालन्याचे जेष्ठ संपादक रमेशजी खोत, रायगडचे जयपाल पाटील, सिंधुदुर्गचे नंदकिशोर महाजन, नाशिकचे नरेंद्र लचके यांनी लघु संवर्गातील वृत्तपत्रांचे प्रश्नासंबंधी अडचणी डॉ. तिडके यांना सांगितल्या. लघु संवर्गातील वृत्तपत्रावर होणारा अन्याय दूर करावा अशी विनंती करून विविध संघटनांचेवतीने निवेदने देण्यात आली.
लघु संवर्गातील वृत्तपत्रांचे प्रश्नासंबंधी डॉ. राहुल तिडके यांनी गांभीर्याने नोंद घेऊन पुढील काळात सहकार्य केले जाईल असे नमूद केले. विशेषतः जाहिरात वितरण करताना लघु संवर्गातील वृत्तपत्रांनाही चांगले सहकार्य करू असे सांगितले. महाराष्ट्रातील नियमित प्रकाशित होणार्‍या व 50 वर्षाहून अधिक कालावधी झालेल्या लघु संवर्गातील वृत्तपत्रांची माहिती डॉ. तिडके यांना देण्यात आली. या पूर्वीची जाहिरात बिले तातडीने अदा करण्यासाठी आवश्यक निधीचे वितरण करावे व संबंधिताना आदेश करावेत अशी मागणीही डॉ. तिडके यांनी मान्य केली.
लघु संवर्गातील वृत्तपत्रांच्या प्रश्नांचा शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी विविध संघटना प्रतिनिधींची बैठक दरमहा घेण्याचे निश्चित करण्यात आले. श्री. नरेंद्र लचके यांनी या बैठकीचे आयोजन करावे असे ठरवून भेटीबद्दल माहितीसंचालक डॉ. राहुल तिडके यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here