अमित कदम यांचे नेतृत्व आणि टेक्नॉलॉजीची प्रेरणा

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर- रस्ते बंद असतील, तर प्रगतीचे दरवाजेही बंद होतात या विचारावर ठाम राहून वडझरी बुद्रुक येथील कदमवस्तीतील युवकांनी एक पिढ्यानपिढ्या बंद असलेला रस्ता शेवटी श्रमदानातून खुला करून दाखवला. अनेक वर्षे सरकारी नकाशांवर असलेला पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला सुमारे दोन किलोमीटरचा ‘नगरकार रस्ता’ आता वास्तवात उतरला असून, तो ग्रामीण विकासाचा एक आदर्श उदाहरण ठरतोय.
ही प्रेरणादायी कहाणी सुरू होते काही युवकांच्या एकत्र येण्याने. या उपक्रमाचे नेतृत्व अमित कदम यांनी केलं. ते Flymit Infotech या नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक आहेत. ते एक अत्यंत प्रतिभावान कोडर असून, वेब अॅ प्लिकेशन्स, मोबाइल अॅकप्स आणि अनेक स्मार्ट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून तयार केली आहेत. केवळ तांत्रिक ज्ञानात पारंगत असणं नाही, तर शिक्षण देण्याची आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांची जिद्द यामुळेच त्यांनी गावातील युवकांना संघटित करून रस्त्याच्या कामाची धुरा उचलली.

त्यांच्यासोबत केशव कदम, प्रकाश कदम, विजय कदम, अनिल गोरडे, नामदेव कदम, बापू कदम, प्रवीण कदम, संदीप कदम, जिजाबापू कदम, सुमित कदम आणि मच्छिंद्र कदम या सर्वांनी एकत्र येत श्रमदान, संवाद आणि समन्वय यांच्या आधारे बंद रस्ता खुला केला.
फोटोमध्ये दिसतो मातीचा ताजा रस्ता, दोन्ही बाजूंनी हिरवेगार शेत, आणि मधोमध एक नवा मार्ग – हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, तो गावकर्यांच्या आत्मविश्वासाचा मार्ग बनला आहे. शेतकरी याआधी अनेक समस्यांचा सामना करत होते – पाणी, खते, बी-बियाणे शेतात नेणे कठीण, शेतमाल बाहेर काढताना वाहतूक अडथळ्यांची. पण आता, या रस्त्यामुळे शेतीचा प्रत्यक्ष फायदा होईल, उत्पन्न वाढेल आणि गावाचा विकास झपाट्याने होईल, असा विश्वास सर्व गावकर्यांनी व्यक्त केला आहे.

हा रस्ता साकार करण्यात कोणताही संघर्ष किंवा तणाव न होता संवाद आणि शांतपणे समजावणूक या मार्गाचा अवलंब करण्यात आला. काहींनी थोडाफार विरोध दर्शवला, पण युवकांनी धीराने रस्त्याचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमात प्रशासनाचाही योग्य पाठिंबा लाभला. संगमनेरचे तहसीलदार, गावचे तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांचे मार्गदर्शन या कार्यात मोलाचे ठरले. विशेष म्हणजे, ही रस्त्याची उघडणी कुठलाही राजकीय रंग न देता, स्थानिक स्तरावरून समाजासाठी केलेले कार्य ठरले.
आज वडझरी बुद्रुकचा नगरकार रस्ता केवळ एक संपर्क मार्ग नाही, तर एक आशेचा किरण आहे. यामुळे गावाचा आर्थिक आणि सामाजिक विकासच नव्हे तर नव्या पिढीतील नेतृत्वाच्या क्षमतेवरचा विश्वास देखील वाढला आहे. ही कथा आहे त्या जिद्दीची, त्या एकतेची – जिथे काही मंडळी म्हणत होते हा रस्ता शक्यच नाही, तिथे युवकांनी म्हणलं होईल, नक्की होईल! आणि तो प्रत्यक्षात आणून दाखवला.
