वडगाव पान येथे १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला

0
27

आरोपी फरार, ग्रामस्थांमध्ये संताप

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात मंगळवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. डी.के. मोरे जनता माध्यमिक विद्यालय, वडगाव पान येथील इयत्ता सहावीतील १३ वर्षीय विद्यार्थिनी कु. ईश्वरी संजय डहाळे हिच्यावर अज्ञात व्यक्तीने ऍसिड फेकून भ्याड हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरी ही मूळची धांदरफळ (ता. संगमनेर) येथील रहिवासी असून वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईसह वडगाव पान येथे मामाकडे राहत होती. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना महादेव मळा परिसरातील सुनसान रस्त्यावर ही घटना घडली.
या रस्त्यावर आजूबाजूला फारशी वस्ती नसल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा फायदा घेत अज्ञात तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने अचानक ईश्वरीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. या भीषण हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेनंतर जखमी ईश्वरीला तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आणि संताप व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सायंकाळपर्यंत आरोपीचा माग काढण्यात यश आले नाही.
दरम्यान, या भ्याड आणि अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. चिमुकल्या विद्यार्थिनीवर असा जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ शोधून कठोर कारवाई करावी, अन्यथा वडगाव पान येथे रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश थोरात पाटील यांनी दिला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here