
परवानाधारकांनाच मर्यादित प्रमाणात विक्री — व्यावसायिक स्पर्धकांचा डाव असल्याचा संशय

संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर शहरातील प्रसिद्ध वेदांत वाईन शॉपवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे संचालक स्वामी डाके यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “वेदांत वाईन शॉपमध्ये नियमबाह्य किंवा अवैध विक्री होत नाही. फक्त परवानाधारकांनाच शासकीय मर्यादेत राहून विक्री केली जाते.”
स्वामी डाके म्हणाले, “आमचा व्यवसाय मागील १७ ते १८ वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि नियमांचे पालन करून सुरू आहे. ग्राहकांचा विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे. मात्र, सध्या काही व्यावसायिक स्पर्धकांकडून जाणूनबुजून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माध्यमांमधून जे काही आरोप करण्यात आले, ते पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.”

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध मद्यविक्रीविरोधात केलेल्या कारवाईबाबत त्यांनी स्पष्ट केले की, “एका वृत्तपत्रात आमच्या दुकानातून खोके विक्री आणि अल्पवयीनांना मद्य विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हे पूर्णतः असत्य आहे. आमच्याकडे असलेल्या नोंदी आणि परवान्यांनुसार केवळ वैध परवानाधारकांनाच विक्री केली जाते. कोणत्याही अल्पवयीन व्यक्तीस मद्यविक्री करण्याचा प्रश्नच येत नाही.”

गुन्हे शाखेने जप्त केलेल्या मुद्देमालाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “२४ बाटल्या एका ठिकाणी आणि ३४ बाटल्या दुसऱ्या ठिकाणी सापडल्या असल्याचे सांगण्यात आले. हा साठा पूर्ण बॉक्स नव्हता, तर काही व्यक्तींनी विविध ठिकाणांहून गोळा केलेल्या बाटल्यांचा एकत्रित संच असावा. तो आमच्या दुकानातूनच विक्री झाल्याचा ठोस पुरावा नाही.”
डाके पुढे म्हणाले, “सत्य लपवता येत नाही. आमच्यावर कितीही आरोप झाले तरी सत्य आमच्या बाजूनेच उभे राहील. आम्ही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल.”

पत्रकार परिषदेत डाके परिवाराने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण निर्दोष व्यक्तींना व्यावसायिक स्पर्धेच्या नावाखाली अडकवणे हा न्यायाला हरताळ फासणारा प्रकार आहे.”