हर घर शौचालय? संगमनेरात वास्तव वेगळंच !

संगमनेर (प्रतिनिधी)-
शेतात शौचास गेल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतल्याने एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे घडली. मंगळवार, दि. 10 जून रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, बुधवारी (11 जून) उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
मयत महिलेचे नाव रुपाली ज्ञानदेव वाघ (वय अंदाजे 35, रा. कर्जुले पठार, ता. संगमनेर) असे आहे. या प्रकरणी मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ व अलका विक्रम पडवळ (सर्व रा. कर्जुले पठार) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील असा की, रुपाली वाघ या शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांच्या घरी शौचालय नसल्यामुळे त्या शेजारी असलेल्या मुरलीधर पडवळ यांच्या पडीत शेतात शौचास जात असत. मंगळवारी सायंकाळी त्या शेतात शौचास गेल्यावर विक्रम पडवळ याने त्यांना अडवले व अश्लील शिवीगाळ करत वाद घातला.
याच वादावरून रात्री आठच्या सुमारास रुपाली वाघ आणि तिचे काही नातेवाईक समजुतीसाठी आरोपींच्या घरी गेले. मात्र तेथेही वाद चिघळला. आरोपी मुरलीधर पडवळ आणि विक्रम यांनी जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली. विक्रम याने चाकू आणून रुपालीच्या पोटात खुपसला, तर आरोपी अलका हिने तिचे हात पकडून ठेवले. या हल्ल्यात मोनिका नावाच्या दुसर्या महिलेच्या कंबरेला देखील चाकूचे घाव बसले.
समाजासाठी गंभीर इशारा –
या घटनेमुळे शौचालयाच्या मूलभूत सुविधेचा अभाव, जातीय द्वेष, व किरकोळ वादातून उगम पावणारा हिंसाचार या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. हर घर शौचालय ही योजना या निमित्ताने कागदावरच असल्याचे दिसत आहे. एकट्या महिलेच्या जिवावर उठणारी अशी दडपशाही थांबवण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
रुपाली वाघ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आज बुधवारी रात्री 12:30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मयतच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा आरोपींवर खून, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीना ०६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यामो घटनास्थळी भेट दिली असून सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.