शहरात मिळणार्या संधी आता ग्रामीण भागात उपलब्ध – रावसाहेब घुगे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ग्रामीण भागात आयटी क्षेत्रात नवे क्षितिज उभारणार्या द बाप कंपनीचा तृतीय वर्धापन दिन आणि प्रथम बॅचचा दीक्षांत समारंभ सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर कंपनीचे सीईओ भाऊसाहेब घुगे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करत सर्व मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे, व्यवस्थापकीय संचालक रामनाथ घुगे, उऋज रामकृष्णमणी सर तसेच कार्यक्रमासाठी खास आमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून ना. सौ. मेघनादिदी साकोरे बोर्डीकर (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री – परभणी) आमदार अमोलभाऊ खताळ पाटील, विनोदजी वाघ (प्रदेश प्रवक्ता, भाजप) उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘द बाप कंपनी’च्या तीन वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर आधारित विशेष डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांतर्फे कु. साक्षी मोकळ, चि. शिववर्धन गीते आणि चि. श्रेयस गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून या प्रवासातील अनुभव शेअर केले. संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात घडणार्या आयटी क्रांतीचे दर्शन घडवले. त्यांनी ‘द बाप कंपनी’च्या आगामी योजनांवरही प्रकाश टाकला.
यानंतर विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, आयटी प्रोजेक्ट सादरीकरण, आणि ऑफर लेटर वितरण सोहळा पार पडला. यावेळी पालकांनीही आपल्या भावना बोलून दाखवल्या. विशेषतः शिवाजीराव पुलाटे सरांचे मनोगत उपस्थितांचे अंतःकरण स्पर्शून गेले. रावसाहेब घुगे म्हणाले, शहरात मिळणार्या संधी आता ग्रामीण भागात उपलब्ध होत आहेत. आपण केवळ रोजगार नव्हे, तर विश्वास निर्माण करत आहोत.
मेघनादिदी साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, द बाप कंपनीने ग्रामीण मुलांच्या हातात कीबोर्ड दिला आणि त्यांच्या डोळ्यांत स्वप्नं जागवली. महिलांसाठीही हे एक आशादायी व्यासपीठ आहे. आ. अमोल खताळ पाटील म्हणाले, संगमनेरच्या मातीतील हा संगणकीय वसंत म्हणजे द बाप कंपनी. ही फक्त सुरुवात आहे. आम्ही कायम पाठीशी आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत डुबे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले.




















