निळवंडे, तळेगाव येथे ना. विखे व आ. खताळ यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण

एक वर्षाच्या कार्यकाळात महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. निधी महायुती सरकारचा असतो पण श्रेय घ्यायला वेगळेच माणस पुढे असतात. याचा विचार जनतेने करावा. नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव खुल्या दिलाने आम्ही स्विकारला. मात्र विजय कसा मिळाला हे जनतेला सुध्दा माहीत आहे.
- आमदार अमोल खताळ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -भोजापूर चारीच्या माध्यमातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेला मदत करण्याबबात आपण निश्चित सकारात्मक विचार करणार आहे. मात्र अनेक वर्षे कार्यरत असलेली 17 गाव तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समिती ताताडीने बरखास्त करून तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी समितीचा आढावा घेवून समिती नव्याने गठीत करण्याबाबतच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावात सुमारे 4 कोटी 58 लाख रुपयांच्या तसेच तळेगाव येथील 1कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आ. अमोल खताळ जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, भाजपाचे भीमराज चतर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, सरपंच शशिकला पवार , तळेगावच्या सरपंच उषा दिघे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
तळेगाव पाणी पुरवठा योजनेच्या प्रश्नाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, वर्षानुवर्ष तीच माणसं पाणी पुरवठा समितीत राहील्याने समितीच्या कामाचा कोणालाही अंदाज येत नाही. त्यामुळेच सिमिती बरखास्त करून त्यामध्ये सर्व गावांचे ग्रामसेवक घेवून दर महीन्याला समितीच्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
राज्यातील महायुतीचे सरकार जनतेसाठी काम करीत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने निर्णय घेतले जात आहे. भोजापुर चारीच्या कामासाठी 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यात या पाण्याचा उपयोग तळेगाव पाणी पुरवठा योजनेला कसा करून देता येईल याबाबत अधिकार्यांनी प्रस्ताव तयार करावा असेही मंत्री विखे पाटील म्हणाले. मालदाडच्या पाणी पुरवठा योजनेला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे सुचनाही अधिकार्यांना दिल्या. मालदाडच्या पाणी पुरवठा योजनेला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.





















