
स्वर्गीय सोपानराव गव्हाणे यांना पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन…

स्वर्गीय शिवराम रखमा गव्हाणे व स्वर्गीय देऊबाई शिवराम गव्हाणे या दांपत्याच्या पोटी नानांचा जन्म झाला. सुरुवातीचा कालखंड हा अतिशय गरिबीचा, परंतु त्याही परिस्थितीत शिक्षण घेऊन साक्षर झालेले नाना… म्हणजे आदरणीय सोपानराव गव्हाणे. बालपणापासूनच घरातील हालाखीची परिस्थिती कुठल्याही परिस्थितीत बदलायची, हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या तीनही भावंडांसह शेती व्यवसायाला नानांनी सुरुवात केली. शेतात नवनवीन बदल घडवून, योग्य वेळी शेतात योग्य पिकं घेण्यात नानांचा हातखंडा होता.

1965-70 च्या दशकात नानांनी कुटुंबाचा गाडा सांभाळताना शेती व्यवसायातूनच प्रगतीकडे वाटचाल केली. शेती व्यवसायात तळेगाव दिघे परिसरात गव्हाणे कुटुंबाचं 70–80 च्या दशकात तळेगाव भागातच नव्हे, तर संगमनेर तालुक्यात नावलौकिक झाला होता. यात नानांना साथ दिली ती तीनही भावंडांनी. त्यामध्ये तुकाराम, निवृत्ती व मारुती हे भाऊ, व तुळसा आणि द्रोपदा या बहिणी सदैव नानांच्या सोबत कार्यरत राहिलेत. त्यानंतर नानांच्या जीवनात आल्या त्या त्यांच्या सहचारिणी मथुराबाई… त्यांच्या संसार रुपी वेलीवर पाच गोंडस फुले उमलली — सुनंदा, कांता, शोभा, विठ्ठल, रखम.

“कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा…” या अभंगाच्या काव्यपंक्तीप्रमाणे अतिशय शिस्तप्रिय असलेल्या नानांच्या सानिध्यात या सर्व मुलांचे संगोपन झालं. आणि हे सर्वच जण आपापल्या जीवनामध्ये यशस्वी झालेत. आपल्या मुलांबरोबरच आपल्या भावांची मुले — ऍडव्होकेट प्रभाकर, स्वर्गीय अशोक, मुक्ताराम, बाबासाहेब, ज्ञानेश्वर, दत्तात्रेय — हे सुद्धा मुले शिकून खूप मोठे झाली. सत्तरच्या दशकामध्ये “मुली शिकल्या पाहिजे” हा त्यांचा हट्ट होता आणि त्यांनी आपल्या सर्व मुली शिकवून मोठ्या केल्या.

आदरणीय नानांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गावातील कुठल्याही लग्न जमवणे असो, बस्ता असो, ते कार्य कधीही नानांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण झालं नाही. तळेगाव आणि परिसरातील कुठल्याही जमिनीची मोजणी करायची असो, भावकीतील भांडण सोडवायचे असो, ते नानाशिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते. नानांचा भौगोलिक अभ्यासही दांडगा होता.

अनेक शेतीतील तज्ञ लोक नानांचा सल्ला घेत असत. शेती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा “कृषिभूषण” हा पुरस्कार नानांना 2010 मध्ये मिळाला. तीर्थरूप आदरणीय भाऊसाहेबजी थोरात यांचे ते खंदे समर्थक व कार्यकर्ते होते. दादांनंतर आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याशीही ते एकनिष्ठ राहिले. सतत काँग्रेस आणि साहेबांसाठी काम करत, पण कुठलेही पद नको, असा त्यांचा आग्रह असे.
नानांचा आपल्या दोन सुना — दिपाली व मनीषा — तसेच नातवंडांमध्ये खूप जीव होता. इतके मोठे व्यक्तिमत्व, पण आपल्या छोट्या नातवंडांमध्ये अगदी ते लहान होऊन रमायचे. तसेच त्यांचे जावई — उद्योजक धनंजय वाळुंज, भानुदास शिंदे, रावसाहेब काकडे, संदीप डुंबरे — हे सुद्धा आपापल्या जीवनात यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. खरं म्हणजे नाना कुटुंबाचे केवळ कुटुंब प्रमुख नाही, तर आधारवड होते. त्यांनी संपूर्ण जीवनभर आपली शरीरयष्टी जपली.

वयाच्या 78 व्या वर्षीही ते सायकलवरून प्रवास करत असत, आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे — हे त्यांचं वैशिष्ट्य. परंतु सन 2020–21 ला संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले. त्या साथीमध्ये नानांना ही कोरोनाची लागण झाली. परंतु त्यातूनही ते सावरत असतानाच अचानक नानांनी अकाली एक्झिट घेतली. नानांचं हे अचानक सोडून जाणं संपूर्ण तळेगाव पंचक्रोशीला अतिशय मनाला वेदना देऊन गेलं. गव्हाणे परिवारा वरती दुःखाचा डोंगर कोसळला.
“तुका म्हणे, एका मरणाची सरे उत्तमची उरे किर्ती मागे…”
या अभंगाच्या ओवीप्रमाणे नाना या जगात नसतील, तरी त्यांच्या आठवणी या प्रत्येकाच्या मनात आजही जिवंत आहेत.
असा जन्म लाभावा..! देहाचा चंदन व्हावा..! गंध संपला तरी..! सुगंध दरवळत राहावा..!
आदरणीय नानांना पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन..!
प्रा. रखम गव्हाणे, तळेगाव दिघे


एक आदर्श पिता : एक आधारवड…
- आदरणीय पूजनीय नानांना माझे कोटी कोटी नमन… नाना, तुमच्या बद्दल कितीही लिहिले तरी शब्द अपुरे पडतात. एक आदर्श पिता म्हणून त्यांचे असे व्यक्तिमत्त्व होते, की त्यांचा प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, स्वच्छ, निर्मळ मन, सर्वांबद्दल आपुलकीची भावना, सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारे, नेहमी हसतमुख असे, आमचे नाना वडील असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आम्ही लहान असताना आमचे एकत्र कुटुंब होते. नाना घरात कर्ते होते, परंतु कोणताही वेगळेपणा दाखविला नाही, कोणताही भेदभाव केला नाही. सर्वांना चांगले संस्कार दिले, सर्वांना उच्च शिक्षण दिले. एक आदर्श कुटुंब घडवणं सोपी गोष्ट नसते, पण नानांनी एवढे मोठे कुटुंब खूप छान घडवले. त्यामुळे नानांची पूर्ण पंचक्रोशीत दबदबा व ख्याती होती.

आम्ही पाच भावंडे, त्यामध्ये तीन बहिणी, दोन भाऊ. परिस्थितीची कधीही उणीव भासू दिली नाही. मी बहिणींमध्ये लहान होते, त्यामुळे नानांची खूप लाडकी होते. कोणतीही गोष्ट मागितली आणि नानांनी दिले नाही, असे कधीही झाले नाही. बाप-लेकीचं नातं वेगळं असतं. मनातील प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने सांगायचे. नाना आमच्या सर्वांचे एक आधारस्तंभ होते, परंतु एक आधारच निखळून पडल्यावर सर्व असून नसल्यासारखे वाटते. ध्यानीमनी नसतानाही अचानक नाना आमच्यातून निघून गेले.

नानासारखे मिळण्यासाठी भाग्य लागते. आमचे नाना लाखात एक होते. नाना, तुमच्या एवढ्या आठवणी आहेत की, मी त्या शब्दात सांगू शकत नाही. नाना, तुम्ही गेल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की, तुमची आठवण आली नाही. वडिलांची व्याख्या कोणीच करू शकत नाही. वडील काय असतात? आपण जेव्हा लहान असतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट पुरवणारे म्हणजे वडील. वडिलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. कोणतेही टेन्शन असूनही नेहमी हसतमुख राहणे म्हणजे वडील. स्वतःचे अश्रू लपवून मुलांचे लाड पुरवणारे म्हणजे वडील. स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या चांगल्या, उज्वल भविष्याची स्वप्न पाहून अपार कष्ट करणे, त्यांना कशाचीही उणीव भासू न देणे — असेच होते आमचे नाना. स्वच्छ, निर्मळ, खळखळ वाहणारा झरा म्हणजे माझे नाना.
पुन्हा एकदा नानांना माझे कोटी कोटी नमन…
सौ. शोभा डुंबरे (तुमची मुलगी)