
क्रिकेटप्रेम आणि चिकाटीमुळे सिद्धेश हासेचा राष्ट्रीय स्तरावर प्रवास
संगमनेर, तालुक्यातील चिखली गावातील सिद्धेश गणेश हासे याने आपल्या चिकाटी, मेहनत व उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. ‘सीबीएससी’ व ‘बिसीसीआय’ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या क्रिकेट सिलेक्शन ट्रायलमध्ये (17) वर्षे वयोगटातून त्याची संघात निवड झाली. यामुळे संपूर्ण तालुका तसेच जिल्हाभरातून त्याचे कौतुक होत आहे.
लहान वयापासूनच क्रिकेटबद्दलची ओढ आणि मैदानावर सराव करण्याची आवड यामुळे सिद्धेश सतत क्रिकेट खेळू लागला. गोलंदाजी, फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात तो तितकाच सक्षम ठरला. दोन वर्षांपूर्वी संगमनेर येथील स्टेडियमवर झालेल्या विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने दमदार खेळ करून छाप पाडली होती. त्यानंतर बारामती, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मराठवाडा व विदर्भ अशा राज्यभरातील अनेक स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेतला आणि उत्तम खेळला. या प्रवासात त्याने अनेक बक्षिसे मिळवली.
सिद्धेश हासे हा चिखली गावचा रहिवासी असून, त्याचे वडील गणेश हासे व्यावसायिक आहेत. मुलाच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सध्या राष्ट्रीय संघात निवड झाल्यामुळे सिद्धेश लवकरच दिल्ली व बंगळूर येथे सरावासाठी जाणार आहे. भारतीय संघातून खेळण्याची त्याची तीव्र इच्छा असून, भारतासाठी खेळणार अशी जिद्द त्याने व्यक्त केली. क्रिकेट विश्वात उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली आहे. गावातील नागरिक, मित्रपरिवार व शिक्षकांनीही सिद्धेशचे अभिनंदन केले. चिखलीच्या मातीने पुन्हा एकदा खेळाडू घडवून दाखवला आहे. सिद्धेशचे यश पाहून आज गावाचा प्रत्येक नागरिक अभिमानाने उभा आहे. भविष्यात तो नक्कीच देशाचे नाव उज्ज्वल करेल.
क्रिकेटपटू बनविण्याचे माझे स्वप्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो बनेलच याची मला खात्री आहे. त्या दिशेने त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू आहे. भविष्यात त्याने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. सध्या त्याची राष्ट्रीय संघात निवड झाल्याने आम्हा सर्वांचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.
गणेश हासे, व्यावसायिक, चिखली.
दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने सिद्धेश हासे याला पुढील वाटचालीस शुभेच्छा.




















