थोरात-तांबे निष्ठावान सतीश आहेर अपक्ष म्हणून मैदानात

0
121

vयुवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -शहरातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात भक्कम आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारे सतीश आहेर हे थोरात-तांबे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून शहरात ओळखले जातात. अनेक वर्षांपासून समाजकार्यासोबतच वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन, पत्रकार संघटना आणि विविध मंडळांत सक्रिय राहून त्यांनी शहरात वेगळी छाप निर्माण केली आहे.
नगरपालिका निवडणुकीतून जनतेची सेवा करण्याचे स्वप्न ते अनेक वर्षांपासून जपत असून यंदाही त्यांनी प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. प्रभागातील नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा असून त्यांच्या नावावर विश्‍वास ठेवणारा एक मजबूत वर्ग आहे. मात्र, प्रभाग चारमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत स्पर्धा तीव्र झाल्याने आणि अनेक दिग्गजांनी या प्रभागावर दावा सांगितल्याने सतीश आहेर यांच्या उमेदवारीवर अनिश्‍चिततेचे ढग दाटले. पक्षनिष्ठा, संघटनात्मक काम आणि समाजातील लोकप्रियता असूनही त्यांच्या नावाला दुय्यम स्थान दिल्याची भावना नागरिकांतूनही व्यक्त होत होती.
यामुळे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिलो, जनतेसाठी नेहमीच तत्पर राहिलो तरीदेखील संधी मिळत नसेल, तर जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरणे हाच मार्ग असे म्हणत सतीश आहेर यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे.
शिवाजीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या आहेर हे बसस्थानक चौकात 2011 पासून स्वतः स्वखर्चाने शिवजयंती उत्सव साजरी करीत असतात तसेच गणपती उत्सव इतर महामानवांच्या जयंतीत देखील त्यांचा मोठा सहभाग असतो. छत्रपती संभाजी महाराज तरुण मित्र मंडळ, वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन, पत्रकार संघटना अशा विविध माध्यमांतून केलेल्या उपक्रमांमुळे शहरातील तरुणांमध्ये त्यांची खास ओळख निर्माण झाली आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील वृत्तपत्र विक्रेते तसेच अनेकांच्या हृदय स्थान केलेले सर्वपक्षीय मित्र असलेला चेहरा म्हणून सतीश आहेर यांच्याकडे पाहिले जाते. गेली दोन टर्म ज्या मित्रासाठी त्यांची निवडणूक जिंकण्यात सतीश आहेर यांचा मोठा वाटा होता. त्याच मित्राकडून आज राजकीय विरोधक होतोय. मग ही मैत्री फक्त राजकीयच होती का असा सवाल ते विचारत आहेत. त्यांच्या अपक्ष उमेदवारीच्या निर्णयाला प्रभाग चारमधील नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक मंडळांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून त्यांच्या समर्थनार्थ जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रभागातील जनतेची भावना, व्यापक पाठिंबा आणि घराघरातील ओळखीमुळे सतीश आहेर यांची अपक्ष लढत आगामी निवडणुकीत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here