संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेरात भव्य स्वागत

0
89

तळेगाव दिघे (प्रतिनिधी)-
नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. पालखी सोहळा सोमवारी (दि.16) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे दाखल झाला. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार उत्साहात स्वागत् करण्यात आले. टाळ मृदुंगांचा गजर, ’ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष अन् विठुमाऊलीचे नाम जपत वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडी सोहळा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संचालक इंद्रजीत थोरात, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लंगोरे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, निमोण गावचे सरपंच संदीप देशमुख, संध्या गडाख, नवनाथ अरगडे, अ‍ॅड. त्रिंबक गडाख, साहेबराव गडाख, सोपान एलके, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, अमोल दिघे, बाबा गडाख, गणेश गडाख, लक्ष्मण गडाख, दौलत गडाख आदी उपस्थित होते. नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर आशा तीन जिल्ह्यांतून ही पालखी पंढरपूरात दाखल होईल.

आमदार अमोल खताळ व अप्पर जिल्हाधिकार्यांनी केले पालखीचे स्वागत

ज्ञानोबा माऊली तुकाराम… या गजरात, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि पायी दिंडी त्र्यंबकेश्‍वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्त 10 जून रोजी निघालेल्या या पायी दिंडीचे सोमवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातून संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथे अश्‍विननाथ महाराज गडावरती संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत.
अश्‍विनाथ गडाच्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आल्यानंतर या पालखीवर ग्रामस्थांच्या वतीने जेसीपीतून पुष्पवृष्टी केली स्वतः आमदार अमोल खताळ यांनी पालखीच्या बैल जोडीचा दोर हातात घेत भक्ती तल्लीन झाले होते. अश्‍विनीनाथ गडाच्या पायथ्यापासून ते पारेगाव गावापर्यंत आ. अमोल खताळ यांनी गळ्यात विना घातला तर त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी डोईवर तुळशी वृंदावन घेऊन पायी चालत विठ्ठल-नामच्या जय जयकारात तल्लीन झाले होते.

पालखीचे डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते भव्य स्वागत

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकर्‍यांची सर्व सुविधा करण्यात आली असून रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आ. डॉ सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांच्यासह गावकर्‍यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले.
मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे दरवर्षी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे जिल्ह्यात प्रवेश करताना या पालखीचे स्वागत करतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीच असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही. असा हा सांस्कृतिक सोहळा जगासाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री थोरात यांनी दुरध्वनीवरुन वारकरी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here