समाजाच्या भल्यासाठी मला मरण आले तर चांगलेच राहील – थोरात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – …तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी थेट धमकी स्वतःला किर्तनकार म्हणून घेणार्या तथाकथित किर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली. या धमकीचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात पसरल्यानंतर संग्राम भंडारे यांच्याबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या घटनेनंतर बाळासाहेब थोरातांच्या समर्थनासाठी महाविकास आघाडीचे नेते तसेच विविध संघटना एकवटल्या असून विविध माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे.
ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रवचन सांगणार्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तींना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का? नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे सर्व मर्यादा ओलांडणे आहे.

भयानक द्वेषापोटी कुणी नथुराम होऊन गोळ्या घालणार असेल तर समाजाच्या भल्यासाठी, सामाजिक समता व एकतेसाठी माझे मरण चांगलेच राहील. अशी भावना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी घुलेवाडी येथे झालेल्या घटनेनंतर तर आम्हालाही नथुराम व्हावे लागेल असे वक्तव्य केले होते.
दरम्यान 19 ऑगष्ट रोजी यशोधन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय समतेची शिकवण देणारा आहे. संतांच्या उपदेशाप्रमाणे आचारण करणारे कीर्तनकार समाजात वंदनीय आहेत. मात्र कीर्तनकार म्हणून कुणाच्यातरी सांगण्यावरून द्वेषाची, हिंसेची भावना पसरवीत असेल. तर ते अतिशय वाईट आहे. संगमनेरची जनता अशा प्रकारांना थारा देत नाही.
आ. सत्यजीत तांबे यांनी संग्राम भंडारे यांना उत्तर देत म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात यांच्यावर टिका करताना विरोधक सुद्धा जपून शब्द वापरतात. त्यामुळे संत – महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतः ला कीर्तनकार म्हणून घेणार्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आवडलेले नाही. सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याच्या काही घटना मागील काळात सातत्याने सुरु आहेत. मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणार्या एका उद्योगपतीला होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली होती. आज संगमनेरच्या सहकारी बँकांमधील ठेवी 7000 कोटींच्या घरात आहेत, रोज 9 लाख लिटर दूध तयार होते, कुक्कुटपालनाचा मोठा पुरक व्यावसाय आहे. संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो, संगमनेरमध्ये 5 मेडिकल कॉलेज ज्यातील चार थोरातांच्या विरोधकांचे आहेत. म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही. संगमनेरकरांची पाण्याची भ्रमंती थांबवून आता निळवंडे धरणातून 24 तास स्वच्छ पाणी भेटते. हे काय उगाच झालेले नाही, एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला यात स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे जे कोणीही सुज्ञ माणूस ते नाकारू शकत नाही. कीर्तनकाराची टिका ही राजकीय तर आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे.
महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या वाणीने हा समाज जागृत झाला आणि पुरोगामी विचारांनी आपली परंपरा या मातीत मजबूत केली. पण आज संग्राम भंडारे सारखे तथाकथित कीर्तनकार महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा अपमान करत आहे अशी भावना राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
धमकी देणारी व्यक्ती ही स्वतःला प्रवचनकार म्हणविते. कीर्तन, प्रवचन करणार्या व्यक्ती या वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून मानवता, सद्भावना, प्रेम यांचा प्रसार करतात, लोकांचे प्रबोधन करतात. परंतु सांप्रदायाच्या आडून हिंसक विधाने करणे अतिशय दुर्दैवी आहे. सदर व्यक्ती व्हिडीओमध्ये महात्मा गांधी यांचा खून करणार्या नथुराम गोडसे याचा उल्लेख ‘नथुरामजी’ असा करते. ही बाब त्या व्यक्तीची मानसिकता विषद करण्यास पुरेशी आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील सुसंकृत व संयमी नेते अशी ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांना अशा प्रकारची धमकी देण्यात आली. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण आहे. या संप्रदायाने जगाच्या कल्याणाची शिकवण मानवजातीला दिलेली आहे. मात्र आज या संप्रदायामध्ये काही समाजविघातक वृत्ती घुसखोरी करून त्याचा राजकीय कारणांसाठी वापर करीत आहेत. याबाबत वारकरी संप्रदायाने सजग राहायला हवे, पण त्यासोबतच अशा प्रकारे धमकी देणार्या समाजकंटकांवर सरकारने कडक कायदेशीर कारवाई करायला हवी असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात किर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संगमनेरसह राज्यात उमटले. काँग्रेससह महा आघाडीच्या नेत्यांनी सदर किर्तनकार भंडारे यांच्यावर कारवाई करण्याची मागण केली आहे.
काँग्रेस पदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खा. निलेश लंके, कॉ. सुभाष लांडे, वंचितच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, यांच्यासह अनेक नेत्यांनी सोशल माध्यमावर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे. दरम्यान संगमनेरमध्ये राष्ट्र सेवादल, अंनिस, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, छात्रभारती, संभाजी ब्रिगेड यासह विविध संघटनांनी शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत बाळासाहेब थोरात यांनी नथुराम गोडसे होऊन जीवे मारण्याची धमकी देणार्या संग्राम भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
तसेच सत्तेचा गैरवापर करून दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे राजाभाऊ आवसक, अंनिसच्या अॅड. रंजना गवांदे, विठ्ठलराव शेवाळे, जयसिंग सहाणे सर, अॅड.समीर लामखडे, अजिजभाई ओहरा, श्रीनिवास पगडाल, अनिकेत घुले, रजत अवसक, राम अरगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

















