पूर्वसूचना न देता फ्लेक्स हटवल्याने नगरपालिकेच्या कारवाईवर नागरिकांचा रोष

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)-
शहरातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते रवींद्र म्हस्के यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधी व श्रद्धांजलीनिमित्त म्हस्के कुटुंबियांनी मलदाड रोडवरील त्यांच्या घराजवळील खासगी जागेत फ्लेक्स लावला होता. स्व. म्हस्के यांचा चौदावा विधी देखील अद्याप पार पडलेला नसताना नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता हा फ्लेक्स काढून नेला आणि कमचार्यांकडून काढताना फाटल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नगरपालिकेत नुकतेच नवीन पदाधिकारी स्थानापन्न झाल्यानंतर शहरात फ्लेक्सबाबत कडक धोरण राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परवानगीशिवाय फ्लेक्स लावण्यास मनाई तसेच मुदत संपल्यानंतर ते काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणांवरील फ्लेक्स हटविण्याची कारवाई सुरू आहे. मात्र खासगी जागेत लावलेला आणि धार्मिक विधीशी संबंधित फ्लेक्स काढताना संबंधितांना पूर्वसूचना देणे अपेक्षित असते, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, हा फ्लेक्स दशक्रिया व श्रद्धांजली विधीशी संबंधित असल्याने कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तो कायम ठेवण्याची माफक अपेक्षा कुटुंबीयांची होती. त्यातही तो खासगी जागेत लावलेला असताना कोणतीही सूचना न देता तो काढून फाडण्यात आल्याने पालिका कर्मचार्यांच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याबाबत म्हस्के कुटुंबियांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे तक्रार केली असता फ्लेक्स पुन्हा लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र फ्लेक्स काढताना तो फाडून टाकण्यात आल्याने आता त्याचा उपयोग तरी काय? असा संतप्त सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला.
दरम्यान, सोमवारी नगराध्यक्ष सौ. मैथिली तांबे यांनी बोलाविलेल्या बैठकीतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. शहरात शिस्त राहावी, अनधिकृत फ्लेक्स हटविण्यात यावेत याबाबत सर्वांचे एकमत असले तरी खासगी जागेतील किंवा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांशी संबंधित फ्लेक्स हटविताना संवेदनशीलता आणि खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
अन्यथा अशा कारवाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता असून नगरपालिकेला नव्या वादांना आणि जनरोषाला सामोरे जावे लागू शकते, अशीही प्रतिक्रिया बैठकीतून समोर आली.





















